पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रत्नांच्या वांटणीची वाट काय ? आरोप निराधार आहेत. अॅटॉमिक बॉबमुळेच आम्ही शस्त्र खाली ठेवीत आहों असें बजावून सांगण्यांत आपण व्रतभंग करीत नाहीं है दर्शविण्याचाच उद्देश आहे. अर्जुनाचीहि युद्धांत गांडीव धनुष्य खालीं ठेवावयाचें नाहीं अशी प्रतिज्ञा होती. ती प्रतिज्ञा आतां कशी मोडतोस असा टोमणा भीमानें मारला. त्याला चोख उत्तर मिळालें तें असें - जिष्णु म्हणे आर्या मी न करिन अन्यत्र कार्मुकन्यास । नारायणास्त्र गोद्विजतेजा द्यावा न मान अन्यास | अगदी हुबेहूब याच शब्दांत हिरोहिटो यांनीहि आपल्या शरणागतीचें समर्थन केलें आहे व त्यांत रगेलपणाचा संबंध नाहीं. बरें कांहीं क्षत्रियांनी व्यक्तिशः मृत्यु पत्करला, पण शरण जाण्याचें नाकारलें, यांतहि त्यांच्या पदरीं दोष येत नाहीं. व्यक्तिशः ज्याचा तो मृत्यु पत्करण्याला मुखत्यार आहे. तथापि सामुदायिक रीत्या युद्ध चालू ठेवणें अशक्य असल्यानें युद्धबंदीची जी अधिकृत घोषणा झाली ती प्रतिपक्षानें खरी मानून चालले पाहिजे. हें विष कोण पचविणार ? महायुद्धरूपी समुद्रमंथनांतून जें दुसरें, हालाहल निघाले त्याचे तात्कालिक पर्यवसान अशा रीतीनें झालें. पण एवढ्यानें कांहीं त्या विषाचा कायमचा बंदोबस्त झाला असे म्हणतां येत नाहीं. अॅटॉमिक बाँबच्या प्रयोगावर राष्ट्रसंघानं निर्बंध लादावे अशी सूचना पुढे येत आहे. तथापि ती बड्या राष्ट्रांना कितपत ग्राह्य होईल व ती कितपत व्यवहार्य होईल, याचा निर्णय ठरण्याला पुष्कळच कालावधि लागेल. असो; सागरमंथनांतून निघालेल्या विषाचा हा विचार झाला. आतां या मंथ- नांतून जीं कांही सामान्य रत्ने निघाली त्यांची वांटणी कशी होणार आणि 'स्वातंत्र्य- चतुष्टय' रूपी जें अमृत निघालें असें म्हणतात तें कोणाकोणाच्या वांटणीस येणार याचा विचार पाहूं. याहि बाबतींत इतिहासाची पुनरावृत्ति होणार असेंच दिसतें. विषप्राशनाला महादेव व लक्ष्मीला वरण्याला विष्णु पुढे आला, त्याप्रमाणें या महायुद्धांतली हानि सोसण्याला अमेरिका आणि लाभ लाटावयाला रशिया पुढें येणार हैं उघड दिसत आहे. अमेरिकेची द्रव्यद्वारा हानि कल्पनातीत झाली आहे; तथापि त्याला कांहीं युरोपांत अथवा आशिया खंडांतहि नवा मुलूख मिळेल असें दिसत नाहीं. रशिया मात्र युरोपांत आणि आशियांत दोनहि ठिकाणीं बेसुमार हात- पाय पसरणार असे दिसतें. युरोपांतला अर्धा अधिक भाग त्यानें आपल्या दिमती- खालीं घेतलाच आहे. आशिया खंडांत जपानशीं नाममात्र युद्ध पुकारून तेवढ्या जोरावर तो मांचुरिया, सिंगकांग, साघालिन इत्यादि प्रदेश गिळून शिवाय चीन- वर कम्यूनिस्टांमार्फत वर्चस्व ठेवू इच्छित आहे.