पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रत्नांच्या वांटणीची वाट काय ? ९३ तील समुद्रमंथनांतून जशी अनेक रत्ने निघाली आणि त्यांची वांटणी झाली तशी या महायुद्धरूपी समुद्रमंथनांतून कोणती रत्ने निघाली व त्यांच्या वांटणीची वाट काय, याचा विचार होणें अगत्याचें आहे. कालकूटाची वाट काय झाली ? समुद्रमंथनांतून जसें शेवटीं अमृत निघालें, तसें या महायुद्धांतूनहि 'स्वातंत्र्यचतुष्टय'रूपी अमृत निघाले आहे असे म्हणतात. त्या अमृताची वाटणी अद्यापि व्हावयाची असल्यानें त्याची चिकित्सा शेवटीं करूं, पण तत्पूर्वी जें हालाहल विष निघालें त्याची वाट काय झाली ते पाहूं. महायुद्ध म्हटले की, त्यांत वस्तुमात्रांचा व मनुष्यमात्रांचा भयंकर संहार व्हाव- याचा हे ठरलेलेच आहे. असा भयंकर संहार आणि जनतेचे तज्जन्य हाल हेंच यांतलें हालाहल विष होय. समुद्रमंथ तलें हालाहल विष प्राश करण्यास महादेव तयार झाले म्हणूनच देवदानवांचें समुद्रमंथन चालू राहूं शकले. प्रस्तुतच्या महायुद्धांतली हानि सोसण्याला अमेरिकेसारखा धनाढ्य देश पुढे आला नसता तर हें महायुद्ध केव्हांच संपुष्टांत आलें असतें. महादेवाचा प्रत्यक्ष समुद्रमंथनांत कांही संबंध नसतांना एतावान् हि प्रभोरथ यद्दीनपरिपालनम् । म्हणजे दीनांचें परिपालन करणे हाच मोठ्यांचा धर्म आहे, असे म्हणून केवळ देवांच्या रक्षणासाठी महादेवानें आपणांवर विषप्राशनाचे संकट ओढवून घेतलें. तसेंच अमेरिकेनेंहि प्रारंभी तरी केवळ इंग्लंडच्या आणि मागाहून इंग्लंडच्या दोस्तांच्या रक्षणासाठी युद्धांतील हानि सोसण्याचा भार स्वशिरावर घेतला; एवढ्या- पुरतेंच हें साम्य समजावयाचें. मागाहून जपान युद्धांत पडल्यानें अमेरिकेचा महायुद्धाशीं साक्षात् संबंध आला हा भाग वेगळा. पण मुळारंभी तरी हालाहल विष पचविण्याला अमेरिकाच पुढे झाली. पण विषाचा धर्मच असा आहे की, तें आपला प्रभाव दाखविल्याशिवाय राहात नाहीं. महादेवानें हालाहल प्राशन केलें, तरी तें प्राशन करतांना त्यांतले कांहीं विष खालीं सांडलें आणि प्रस्कन्नं पिबतः प्राणैर्यत्किंचिजगृहुः स्म तत् । वृश्चिकाहिविषौषध्यो दन्दशकाच ये ऽ परे ॥ म्हणजे तें सांडलेले विष साप, विंच व इतर कीटक आणि वनस्पति यांनी ग्रहण केलें आणि तेवढ्या विषाच्या जोरावर तें प्राणिमात्रांना छळत असतात. असाच प्रकार आधुनिक महायुद्धरूपी समुद्रमंथनांतहि झाला आहे. युद्धाची हानि सोस- ण्याला प्रत्यक्ष अमेरिका पुढे झाली तरी मानवरूपधारी सर्पवृश्चिकादिकांनी त्या विषाच्या प्रभावानें काळ्या बाजारांतून अनेकांना दंश करून छळाची पराकाष्ठा केली.