पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचं अखेरचें पर्व ज्या मिलान शहरवासीयांनीं पूर्वी त्याला मानपत्र देऊन त्याचा गौरव केला होता, ज्या मिलान शहराला तो इटालीचें बुद्धिकेंद्र समजे, ज्या मिलान शहरांतूनच त्यानें रोमवर चाल करून आपल्या हाती अधिकारसूत्रें घेतली, त्याच मिलान शहरांत त्याचें प्रेत उलटें टांगलें जावें, रस्त्यांत भिरकावून दिले जावें, त्याच्या प्रेतावर बायका-मुलांनी थुंकावें, लोकांनीं तें तुडवावें इत्यादि प्रकार अत्यंत गलिच्छ व माणुसकीला न शोभणारे होत, याविषयीं कोणाचा मतभेद असण्याचे कारण नाहीं. तो शत्रुपक्षीय असून, जुलमी असेल, त्याची मतें कोणास पटणारी नसतील, त्याच्या साम्राज्यतृष्णेच्यापायीं राष्ट्रावर युद्धाची आपत्ति ओढवली असेल, अथवा आणखी शेंकडों अपराध त्याच्या हातून झाले असतील. पण म्हणून इटालियनांनी त्याच्या देहाचे जे धिंडवडे काढले ते कमी गर्हणीय ठरतात असें नाहीं. ज्यूलिअस सीझरच्या मृत्यूबद्दल सूड घेणारा जसा अँटोनी भेटला तसा कोणी अँटोनी भेटेपर्यंतच त्यांच्या या गमजा चालावयांच्या ! हीं काय भेकडपणाची लक्षणें शारीरिक अवहेलना करणाऱ्या लोकासंबंधी वर जें विवेचन केलें तेंच त्याची शाब्दिक अवहेलना करणा-यांसहि लागूं आहे. तो जिवंत असतां त्याच्याविरुद्ध एक शब्दहि बोलण्याची ज्यांची छाती नव्हती ते आतां त्यास भेकड, नतद्रष्ट, खुनशी इत्यादि वाटेल त्या अपशब्दांची लाखोली वाहात आहेत. ज्याने लहान- पणींच प्रतिपक्षाला दगडानें चेचण्यास कमी केले नाहीं, शाळेतील वादविवादांत रांजा जुलुमी झाला, तर तो देहान्त शिक्षेस पात्र ठरतो, असें छातीठोकपणाने ज्यानें सांगितलें, फोर्ली गांवच्या मेयरला भर सभेत खिडकींतून फेकून देण्याची ज्यानें धमकी दिली, तुम्ही शिक्षा दिलींत तरी मी पुनः हे कृत्य करणार, असे ज्यानें न्याया धिशास बजाविलें, जो खांद्यावर बंदूक टाकून गेल्या महायुद्धांत लष्करांत दाखल झाला, तोफा डागण्याचें काम स्वतः करीत असतां तोफ फुटून बेचाळीस जखमा झाल्या असतांना, क्लोरोफॉर्म न घेतां ज्यानें आपल्या अंगांतले तोफेचे तुकडे काढविले, विमान विद्या आत्मसात् करण्याची ज्याने मोठेपणीहि हांव धरली आणि कोणाच्याहि धाकदपटशाने ज्यानें आपल्या मताला कधींहि मुरड घातली नाहीं, तो मुसोलिनी भेकड होता, असे आतां त्याच्या पश्चात् जगास भासविणे हा मात्र भेकडपणा खरा. तीन महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरलें असो. मुसोलिनीचा अशा रीतीनें शोचनीय अंत झाला, पण हिटलरची वाट काय झाली, याचें उत्तर मात्र तर्काच्या जोरावरच द्यावें लागतें. हिटलर बर्लिन- मध्ये असतांना गोळ्याचा धक्का लागून मरण पावला, का आत्महत्या करून त्यानें देह टाकला, अगर त्याचा कोणी अज्ञात इसमानें खून केला, अथवा तो बर्लिनहून गुप्तपणें निघून गेला असून त्याचा शोध केला जाऊं नये म्हणून त्याच्या मृत्यूची कंडी उठ-