पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा लोकांच्या नित्य चर्चेतील विषय होता. वर्तमानपत्रवाचनाची गोडीहि या कालांत किती तरी पटीने वाढली. युद्धासंबंधाच्या चर्चेत अनेक ठिकाणी वाद अपुरे ठेवले जात. अशाकरितां कीं, “ पुढचा केसरी येतो तो पाहूं आणि त्यांत त्याचा निर्णय समजेल. " आणि या अपेक्षेनें पुढील अंक उघडला व वाचला जात असे आणि तत्पूर्वी असलेल्या अनेक शंकांचा खुलासा त्यांत होऊन जाई. वादविवाद कौशल्य "" "" लिखाणांतील बोचकपणा हा टिळकांपेक्षाहि खाडिलकर यांच्या लेखांत थोडा अधिक असे आणि त्याची झाक श्री. करंदीकर यांच्या लिखाणांतहि दिसून येते. सरकारवर समोरासमोरून हल्ला करण्याचे प्रसंग करंदीकरांच्या कारकीर्दीत अनेक आले. त्यामध्यें हिंदुमुसलमानांच्या दंग्यासंबंधांत बंदोबस्त ठेवण्याच्या बाबतीत सरकारनें हेतुपूर्वक दुर्लक्ष केले असतां "सरकारी संगिनी कशाकरितां ! हा एक लेख श्री. करंदीकर यांनी लिहिला होता. तसेंच आर्थिकदृष्ट्या हिंदुस्थानची दुरवस्था असतांना सरकारी फडणविसांनी लबाडीनें आणि हातचलाखीनें हिंदु- स्थानची सुस्थिति आहे असे भासविण्याचा यत्न केला असतां “भरभराटलेला हिंदुस्थान ! या मथळ्याचा श्री. करंदीकर यांनी एक लेख लिहिलेला होता.. हे दोन्ही लेख चिरस्मरणीय आहेत. असत्याची किंवा लबाडीची चीड ही श्री. करंदीकर यांच्या प्रभावी लिखाणाला प्रेरक होते. १९४२ च्या चळवळी- च्या वेळी पुण्यांत अप्पाबळवंत चौकामध्ये जो निष्कारण गोळीबार झाला त्यावर श्री. करंदीकर यांनी लिहिलेला लेख असाच सडेतोड आहे. सरकारचा रोष ओढवेल की काय अशी आशंका वाटण्यासारखा विशेषतः वरील शेवटचा प्रसंग होता. यतींद्रदास यांना प्रायोपवेशनानें तुरुंगांत मृत्यु भाला आणि त्या योगें सर्व देश खळबळून गेला त्या वेळींहि श्री. करंदीकर यांनी लिहिलेला. अग्रलेख असाच तडाखून लिहिलेला होता. वादविवादामध्यें प्रतिपक्षाला सपशेल लोळवणारा समर्पक तडाखा देण्याच्या बाबतींतहि करंदीकर यांचा हातखंडा आहे. लोहगांवच्या सोल्जरांच्या गोळीबारावरील खटल्यांत, त्यांना सोडून देणाऱ्या निका- लावर " काळ्यागोऱ्यांतील न्याय म्हणून लिहिलेले स्फुट, कोर्टाच्या बेअदबीच्या कायद्याखाली आक्षेपार्ह ठरलें होतें आणि त्याबद्दल केसरीला पांच हजार रुपये दंड झाला. या वेळी श्री. केळकर हे मुख्य संपादक होते आणि त्यांनी स्वतःच हा खटला लढवून कोर्टाच्या बेअदबीच्या कायद्याचे वाभाडे काढल्याचें प्रसिद्ध आहे. पण ज्या स्फुटावरून हें प्रकरण उत्पन्न झालें तें स्फुट श्री. तात्यासाहेब करंदीकर यांचे होते हें कोणास विशेष माहीत नाहीं; पण ही गोष्ट आतां प्रकट करण्यास हरकत नाहीं. "" अनेक फाटे फुटलेल्या एखाद्या वितंडवादाला एक-दोन स्फुटांतच उत्तर देऊन तडाख्यानें निकालांत काढण्याच्या बाबतीत श्री. करंदीकर यांचें कौशल्य