पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळ्या समुद्रांतले काळकूट झारशाहीवर ताण करणारे ठराव या गुप्त बैठकीत जर्मनीवर चौफेर हल्ला कसा चढवावयाचा याची योजना निश्चित झाली आणि तींत एकसूत्रीपणा येण्याकरितां त्रिराष्ट्रांच्या लष्करी तज्ज्ञांनी वारंवार विचारविनिमय करावा असें ठरलें, हें स्वाभाविकच आहे; कारण महा- युद्धाचा त्वरित निकाल लावणें हा मुख्य उद्देश आहे. परंतु जर्मनीला बिनशर्त शरणागति स्वीकारावयाला लावणें, युद्धसमाप्तीनंतर त्याला निःशस्त्र करणे, रण- साहित्यांचा लवलेश जर्मनींत राहूं न देणें, रणसामुग्रीचे कारखाने नामशेष करणें, नुकसानभरपाईचें ओझें जर्मनीवर लादणें, युद्धगुन्हेगारांना शासन करणें, नाझी- पक्ष नामशेष करणें, केवळ नाझी अनुयायांनाच नव्हे तर युयुत्सु वृत्तीच्या जर्मनांना कोठेंहि ठाव मिळूं न देणें, जर्मनीची लष्करी योजनासमिति निर्मूळ करणें आणि या सर्व योजनांची बजावणी करण्यासाठी जर्मनीचे तीन, किंवा फ्रान्स सामील झाल्यास चार, विभाग करून त्यांवर मित्रराष्ट्रांचे नियंत्रक नेमणे आणि त्या नियं- त्रक श्रेष्ठींनी बर्लिनमध्यें बसून सर्व बंधनांची बजावणी करणे, अशा स्वरूपाचे जे ठराव झाले आहेत ते आजपर्यंत गाजलेल्या कोठल्याहि झारशाहीवर ताण करणारे आहेत यांत शंका नाहीं. इतक्या कडक बंधनांनी जर्मन राष्ट्राला करकचून आव ळावयाचें ठरले असून, जाहीर घोषणेंत पुनश्च अशी प्रौढी मिरविली आहे की, जर्मन जनतेचा आम्हांस उच्छेद करावयाचा नसून फक्त जर्मनींतला नाझी-पक्ष व सोटेशाही यांचींच तेवढी पाळेमुळे खणून काढावयाची आहेत. एखाद्या माणसाला, तो शिव्या देतो म्हणून जीभ छाटून, लाथा देतो म्हणून पाय तोडून, गुद्दे मारतो म्हणून हात कलम करून लुळापांगळा केल्यावर तुला ठार करावा अशी कांहीं आमची इच्छा नाहीं, फक्त तुझे उपद्रवी अवयव तेवढेच छाटले आहेत, असे सांगण्यानें जेवढे समाधान वाटेल तेवढेच समाधान जर्मन जनतेला त्रिराष्ट्र- प्रमुखांच्या मुखांतून निघालेली ही घोषणा ऐकून वाटेल. जर्मनीची वर दर्शविल्या- प्रकारें खच्ची केल्यावर बाकी जागेवर जें राहील तें जर्मन राष्ट्र म्हणून तरी ओळखतां येईल कां नाही याची वानवाच आहे. ज्या देशांतले शेकडा ९५ टक्के लोक नाझी पक्षाचे आहेत त्या देशांतला नाझी पक्ष तेवढा नष्ट करावयाचा म्हटल्यास बाकी शिल्लक काय राहणार असा प्रश्न विचारावयासच नको. याची बजावणी कशी करणार ? खरा प्रश्न आहे तो हा की, त्रिराष्ट्र प्रमुखांनी हे सगळे डोंगर रचले खरे, पण ते सगळे कितपत आणि किती दिवस टिकतील? जर्मनी बिनशर्त शरण आला पाहिजे असा आग्रह धरल्यामुळे युद्ध लांबत जात नाहीं काय, असा एक सूचक प्रश्न कांही दिवसांपूर्वी कॉमन्स सभेत विचारला गेला होता. त्याला त्या वेळी जरी नकारार्थी उत्तर देण्यांत आलें, तरी आतां जर्मनीवर लादले जाणारे