पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध तिस-या बड्या दादाच्या भेटीला निघाले. क्रायमिया द्वीपकल्पांत सेबॅस्टोपोलच्या पूर्वेस ३० मैलांवर याल्टा नांवाचें एक हवाशीर ठिकाण आहे. तेथें रशियाचा माजी झार दुसरा निकोलस याचा उन्हाळ्यांत येऊन राहावयाचा राजवाडा आहे. त्याच राजवाड्यांत या तिघां आधुनिक झारांची सोमवार दि. ५ ते सोमवार दि. १२ अखेर आठ दिवस बैठक होऊन, सोमवारी अमावास्येच्या रात्री त्रिवर्गाच्या सह्यांचें पत्रक तयार होऊन तो निर्णय जगजाहीर करण्यांत आला. सटवाईनें काय लिहिले आहे ? नव्वद वर्षापूर्वी ज्या कामिया द्वीपकल्पांत ब्रिटिश व रशियन सेनापति शत्रुत्वानें प्राणपणाने लढत होते त्याच क्रायमियांत या वेळी त्याच राष्ट्रांचे सेनापति जर्मनीविरुद्ध चढाई करण्याच्या योजना अत्यंत मित्रत्वानें आंखीत बसलेले पाहून कोणास चमत्कार वाटणार नाहीं ? असो. माजी झारच्या राजवाड्यांत बसून ठर- विलेल्या या निर्णयावर झारशाहीची छटा उमटली असल्यास त्यांत नवल नाहीं. मागील युद्धाच्या वेळी प्रे. विल्सनसारखा एक तरी सत्वशील पुढारी विजयी राष्ट्रांच्या प्रमुखांत असल्यामुळे वरकरणीं तरी 'ना मुलुख ना खंडणी' अशा घोषणा केल्या गेल्या. याल्टा येथील सांप्रतच्या निर्णयांत तसला कांहीं आडपडदा न ठेवतां जर्मनीला पूर्णपणें चिरडून त्याचा लोळागोळा करण्याचें ठरलें आहे. जी जर्मनीची गत करण्याचें योजिलें गेलें आहे, तसलीच योजना जपानसंबंधानेंहि ठरविली गेली असावी; पण ती योजना प्रकट करण्याची वेळ अद्यापि आली नसल्याने जपानासंबंधी एक अवाक्षरहि या जाहीर घोषणेंत नाहीं. तथापि जर्मनीचा निकाल लावल्यानंतर जपानची पाळी येईल त्या वेळी त्याच्या कपाळींहि जर्मनीसारखींच बंधनें लिहिलीं जातील हें सांगावयास नकोच. मूल जन्माला आल्यानंतर पांचव्या दिवशीं सटवाई त्याच्या कपाळावर त्याचें भविष्य गुप्तपणें लिहून ठेवतें. त्याप्रमाणें या त्रिराष्ट्र प्रमु खांनीं जपानचेंहि भविष्य या बैठकीत गुप्तपणें चर्चिलें असेल; पण तें प्रकट कर ण्याची संधि अद्यापि दूर असल्यानें त्याची परिस्फुटता करण्यांत आली नाहीं. तरी पण अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधींच्या समितीचा अध्यक्ष सीनेटर नाली हा एवढे बोलून गेलाच की, यापुढे जपानच्या युद्धांत भागीदार होण्याचें वचन स्टॅलिननें रूझव्हेल्टला दिलेंच असेल ! पण आपण हा गौप्यस्फोट करीत आहों असें वांटून लगेच जीभ चावून त्यानें त्यावर अशी मल्लिनाथी केली की, मला अशी माहिती कळली आहे असा याचा अर्थ घेऊं नका, हा केवळ माझा तर्क आहे. तर्क असो अथवा प्रत्यक्ष कळलेलें वृत्त असो, युरोपच्या विल्हेवाटींत स्टॅलिनला प्रामुख्य देऊन आणि त्याच्या संतोषाकरितां पोलंडच्या पूर्व-भागाचें त्यास बलिदान करून, स्टॅलिनकडून जपानच्या युद्धांत सहकार्य करण्याचें वचन चर्चिल व रूझव्हेल्ट यांनी मिळविलें असणें संभवनीय आहे.