पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.
(५)



याविषयीं शिक्षण घेण्यास राजांस हा इतिहास एक उत्तम साधन होईल. दरबारांतील मुत्सद्दी लोकांस राजा अनावर झाला असतां आपल्या कपाळी बदसलागारपणाचा डाग न लागेल याविषयीं त्यांनी सावधगिरी ठेविली नाहीं तर कशा अफती येऊन पडतात ते समजणार आहे. व अशा प्रसंगी कसे वागावें हें त्यांस कळणार आहे. सरदार व मानकरी लोकांस रेसिडेंटाचा आश्रय केल्यापासून आपले मनोरथ सिद्ध न होतां कधीं न पुसून जाणारा बेइमानीपणाचा डाग आपल्या कपाळी लागतो हे समजून येऊन यापुढे तशा कृत्यापासून त्यांचें मन पराङ्मुख होणार आहे. कुटाळखोर लोकांस इच्छित मनोरथाची निष्फळता पाहून व आपली जगांत निंदा झाली त्याबद्दल वाईट वाटून अनुताप होणार आहे आणि राजद्रोह करून राज्य धोक्यांत टाकणे हे कृत्य पराकाष्ठेचे घातक आणि अनर्थोत्पादक आहे असे प्रजेच्या मनांत पक्के ठसणार आहे.
 होय; तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे इतिहास जाणण्यामध्ये फायदे आहेत हे आम्ही कबूल. करतो, पण तो तसा मनोवेधक आणि शिक्षण घेण्यास योग्य असा लिहिला तर पाहिजेना ? असा कोणी अक्षेप घेतला म्हणजे त्याबद्दल उत्तर देणे फार कठीण असें खरें. माझ्या सारख्या अनधित मनुष्याने निर्मळ मनाने हें कबूल केले पाहिजे कीं, जसा मनोवेधक आणि उत्तम रीतीने हा इतिहास लिहिला पाहिजे होता तसा मला लिहितां आला नाहीं आणि येईल तरी कसा !
 माझ्या आयुष्यक्रमाचे वृत्त फार चमत्कारिक आहे. माझा ज्या ग्रामांत जन्म झाला तें शंभर किंवा सवाशे घराचे एक खेडेगांव आहे. त्या गांवांत ब्राम्हणांची दोन किंवा तीन घरे आहेत, आतां मी नुक्ताच जन्मभूमीचे दर्शन घ्यावे म्हणून पस्तीस वर्षांनी या गांवीं गेलो होतों. माझ्या घराच्या अंगणांत एक ग्रामस्य ब्राम्हण उभा होता त्यास पाहून माझे आतेस असें वाटलें कीं, तो कोणी अतिशूद्र आहे, परंतु विचारल्यावरून तिला समजलें कीं, तो ब्राम्हण आहे. हें ब्रम्हतेन मुद्दाम तिने माझेसमोर आणले होतें आणि त्या ब्रम्हतेजाच्या दर्शने करून मी पुनीत झालो असे मला वाटले ! ! असें हें माझें जन्मग्राम ! त्या गांवांत मी दहा किंवा अका वर्षांच्या वयाचा होईपर्यंत तेली, तांबोळी, । आणि वंजारे यांच्या मुलांबरोबर खेळलो; नंतर माझे तीर्थरूप यानी मला गुजराथेंत नेलें. त्यांजकडे गायकवाड सरकारच्या एका हुजरात पागेचे काम होते आणि ती पागा रेवाकाठ्याच्या एजंटाच्या तैनातीस असल्यामुळे त्या पागेचे स्वार भिल्ल व कोळ्यांच्या गांवीं बंदोबस्तासाठी ठाण्याठाण्यानी ठेविले होते, त्यामुळे माझ्या तीर्थरूपांत त्या ठाण्यांत राहावे लागत असे वा फिरावे लागत असे. त्यांजबरोबर मी या ठाण्यांतून त्या ठाण्यांत आणि या अरण्यांतून त्या अरण्यांत भटकलो. विद्याभ्यास करण्याचा काल निरक्षर मराठे व मुसलमान यांजबरोबर सोकट्या | खेळण्यांत, बंदुकीने निशाणे मारण्यांत, आणि घोडे फिरविण्यांत घालविला. पागेचे जमाखर्च कसे लिहावे इतके मात्र चांगले शिकविलें होतें.
परंतु माझी देवेरेषा विलक्षण होती. रेवाकाठ्याच्या एजंटाच्या स्वारीबरो- बर माझे तीर्थरूप रेवाकाठ्याच्या तैनाती स्वारांच्या बंदोबस्तासाठी कांही वर्षे फिरले, ही मला उत्तम संधी सांपडली, रेवाकाठ्याच्या हपिसांत मी जाऊं लागलो आणि त्यामुळे