पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभाराची नवीन व्यवस्था. (४३) त्यास आपल्या अज्ञानपणाविषयों पूर्ण ज्ञान होते हा त्याजमध्ये उत्तम गुण होता. आपणास सर्व समजते असा त्याने पोकळ डौल घालून दुसऱ्याच्या सदुपदेशाचा कधीही अव्हेर केला नाही. कर्नल बार साहेब यांची आपणावर मेहेरबानी व्हावी अशी त्याची फार इच्छा होती. त्याजविषयीं त्यांचे अंतरंग चित्त कसेही असो, परंतु वरून ते त्याचा फार तिरस्कार करीत, सबब बार साहेब यांस बरे वाटेल असे कृत्य करण्याकडेच त्याचे पूर्ण लक्ष होतें, आणि न्यायानुरूप वर्तन हेच काय ते त्यांची मर्जी सुप्रसन्न करून घेण्याचे साधन होतें. राज्यांत आपले महत्व वाढावे आणि लोकांमध्ये आपली कीर्ति व्हावी अशी त्यास इच्छा उत्पन्न झाली होती, आणि न्यायानुसारें राज्यकारभार चालविल्याने मात्र यश मिळावयाचे हे त्याचे मनांत इतके चांगले ठसले होते कीं, नायब दिवाणगिरीचा अधिकार मिळाल्यावर त्याने कोणताही अन्याय केला नाहीं व दुसन्यास करूं दिला नाही. महाराजांवर त्याचें वजन असे व तो त्यांचा अति आवडता होता, या योगाने त्याचे सर्व हेतु शेवटास जाईल. वरिष्ट अदालतीची स्थापना झाल्यानंतर न्यायाच्या कामाची योजना नीटनेटकी होती, परंतु जमाबंदीच्या संबंधाने अदालतीच्या कामदारांस जे कांहीं कर्तव्य होते ते त्यांच्याने करवले नाहीं, यामुळे त्या खात्यांत विशेष घोटाळा झाला होता. खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत धान्याचा व कापसाचा भाव होता तो त्या वेळेस अगदी उतरला होता. पूर्वी ठरविलेल्या जमाबंदीत कमी करून योग्य व्यवस्था करण्याचा समय अगदी जवळ येऊन ठेपला होता. अशा समयी लोकांवर एकादा नवीन कर बसविणे अगदीच अविचाराचे काम होते, असे असतां ' गादी नजराणा ' म्हणून जमाबंदीवर शेंकडा पंचवीस रुपये घेण्याविषयी मल्हारराव महाराजानी हुकूम दिला, आणि त्या गोष्टीस राहुरकर यांचेही अनुमत पडलें. हा कर बसविणे अगदी अनुचित आहे, रयतेपासून पैसा वसूल होणार नाहीं, आणि जुलमाविषयी मात्र बोभाटा होईल, असे महाराजांच्या हितेच्छु मंडळीनी त्यांस सांगितलें, परंतु त्यांस उलटे असे वाटले कीं, खंडेराव महाराज यानी अशा प्रकारचे पुष्कळ वेळां नजराणे घेतले असतां कामदार लोक मलाच निषेध करतात तस्मात् त्यांचें मन माझ्याविषयों शुद्ध नाहीं. वरिष्ट अदालतीची स्थापना झाल्यामुळे दिवाण यांचे वजन कमी झाले ही गोष्ट कर्नल बार साहेब यांस आवडली नाहीं, आणि त्याबद्दल ते महाराजांस वारंवार ठपका देत असत, यामुळे गोपाळराव मैराळ यांचा महाराज विशेष तिरस्कार करूं लागले येवढेच काय ते त्यापासून फल निष्पन्न झाले. कर्नल बार साहेब यानीं सन १८७२ चे साली मुंबई सरकारास रिपोर्ट केला आहे. त्यांतील सदुसष्टावे कलमावरून असे दिसतें कीं, बळवंतराव राहुरकर यांचा कारभार न्यायास अनुसरून चालला होता असे त्यांसही वाटले होते. ते म्हणतात:-