पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पक्षाची मंडळी यांचा आनंद व त्यांच्या तोंडावर आलेली टवटवी, व त्यांच्या प्रतिपक्षीय लोकांची खिन्नता, व त्यांच्या तोंडावर आलेले वैवर्ण्य यांचे यथार्थ वर्णन करणे शक्य नाहीं. या संसारांत आशा भंग झाल्यापासून होणाऱ्या दुःखाचा आणि येऊन ठेपलेले दुर्निवार्य संकट टळण्यापासून होणाऱ्या सुखाचा कमीज्यास्त अनुभव प्रत्येक मनुष्यास आहेच. यासाठी लोकांनी दोन्ही पक्षाच्या मंडळीच्या मनावर त्या समयीं जे संस्कार घडले असतील त्याविषयी योग्य तर्क करावा. मल्हारराव महाराज यांस तर तो आनंद अगदी अनावर झाला. आणि ते मोठ्या आनंदाने आपल्या मुक्कामावर चालते झाले, व त्याच दिवशी अस्तमानी बऱ्याच थाटमाटानी कापांतून आपला मुक्काम उठवून राजवाड्यांत आले. राणी साहेब प्रसूत झाल्यावर सहा महिनेपर्यंत रोसडेंट साहेब यांच्या बंगल्यांतच होत्या. नंतर त्यानीं तारीख ३ जानेवारी सन १८७२ रोजी बडोदें सोडले आणि पुण्यास येऊन राहिल्या. बार साहेब यांचे मनांत असे होते की, त्यानीं वडोद्यांत राहावें, आणि त्यांच्या योग्यते- प्रमाणे त्यांस नेमणूक करून देववावी. याबद्दल त्यांनी महाराजांचें अनुमत देखील मिळविले होतें, परंतु राणी साहेब यांस ते आवडले नाहीं. आपणास दत्तक द्यावा असा त्या आग्रह धरून बसल्या, आणि तसे होणें शक्य नाहीं असे त्यांस वाटलें, तेव्हां मल्हारराव महाराज यांचा कांहीं इलाखा न ठेवितां आपल्या नेमणुकीबद्दल त्या निराळी जहागीर मागूं लागल्या, हे असे असमंजसपणाचे मनोरथ पूर्ण करणे बार साहेब यांस कोठे शक्य होतें ? सरते शेवटी त्यांस दरसाल छत्तीस हजार रुपये द्यावे असे ठरले. जमनाबाई साहेब कापांत जाऊन राहिल्या त्या वेळेस त्यांनी आपल्या बरोबर जे काही जवाहीर नेले असेल ते मात्र त्यांस पुण्यास बरोबर नेऊं दिलें. वाड्यांतील त्यांची सर्व जिनगी महाराजांच्या हातास आली. स्त्रीधनाबद्दल म्हणून एक लाख रुपये मल्हारराव महाराज राणी साहेबांस पुण्यास जाते समयीं देत होते, परंतु त्यानीं ते घेतले नाहींत. तदनंतर मुंबई सरकारानी रेसिडेंट साहेब कर्नल फेर यांचे द्वारे महाराजांबरोबर जो पत्रव्यवहार केला त्यावरून असे दिसतें कीं, बडोदें सोडल्याबद्दल, व लाख रुपये घेतले नाहीं त्याबद्दल राणी साहेब यांस अनुताप झाला होता व त्यांचा कैवार घेऊन मुंबई सरकार असे म्हणत होतें कीं, त्यानी हमेषासाठी बडोदें सोडलें नाहीं, त्यांची इच्छा होईल तेव्हां त्यांस बडोद्यास येतां येईल व त्यांस देऊं केलेले रुपये घेण्यास त्या कबूल आहेत, यासाठी महाराजानीं ते त्यांस आतां द्यावे. ही गोष्ट मल्हारराव यानीं स्पष्ट नाकबूल केली. त्यांचे म्हणणे असे पडले की, मी सर्व प्रकारें राणी साहेब यांची उत्तम व्यवस्था ठेवीत असतां त्या बडोदें सोडून गेल्या हें चांगले केले नाहीं; सबब आतां माझे इच्छेवांचून त्या बडोद्यास येऊं शकणार नाहीत; आणि मी रुपये देत असतां त्यानीं माझा तिरस्कार करून घेतले नाहीत, सबब आतां मी ते देणार नाहीं. याबद्दल मुंबई सरकारांनी पुनः कांहीं महाराजांस आग्रह केला नाहीं.