पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६. जुन्या राज्यपद्धतीचें वर्णन व त्यांत पुढें फेरबदल. मल्हारराव महाराज यांच्या पूर्वजांच्या राज्यकारभाराची पद्धत कशी होती त्याविषयी संक्षिप्त वर्णन-खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत जुन्या रीतीत फेरबदल-खंडेराव महाराज यांच्या स्वभावाचें वर्णन-राज्यां- तील अधिकारी यांची नांवनिशी व त्यांची योग्यता. मल्हारराव महाराज यांचे पूर्वज बडोद्याच्या राज्याचा कारभार कोणत्या रीतीने चालवीत होते याविषयींची संक्षिप्त हकीकत सांगितली पाहिजे; तेणेकरून मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील राज्यकारभाराची त्यांच्या पूर्वजांच्या राज्यकारभाराशी तुलना करून पाहतां येईल; आणि त्या योगानें त्यांच्या राज्यकारभारांत जे दोष होते त्याबद्दल त्यांजकडे किती बदनामी येते याचा लोकांस विचार करण्यास साधन होईल. पूर्वी राज्याचा सर्व मुलूख इस्ताव्याने देत होते. दिवाणी फौजदारीचा अधिकार देखील महालच्या इस्तावेदाराकडे सोपवीत असत. इस्ताव्याची अवधी संपेपर्यंत तो इस्तावेदार प्रांताचा अथवा परगण्याचा राजा म्हटले तरी चालेल. त्याने पाहिजेल तसा जुलूम केला तरी त्याबद्दल प्रजेची दाद लागण्यास जशी व्यवस्था पाहिजे होती तशी कांहीं एक नव्हती. इस्तावेदाराने दरबारांतील प्रमुख कामदाराचे साधन ठेविले म्हणजे झाले, मग त्याने पाहिजे ते करावें. इस्तावेदार तरी असे अल्प स्वल्प होते काय ? नाहीं. बाबासाहेब किल्लेदार, गोपाळराव मैराळ, मीर सरफराज अल्ली, नबाबसाहेब, आणि हमुमिया, जामुमिया, अशी राज्यांतील मोठी मोठी घेडे ही प्रांताचे व परगण्याचे इस्तावेदार यांच्या जुलमाबद्दल उपद्रुत मनुष्याने फिर्याद करावी कोणाजवळ, आणि ती ऐकतो कोण. इस्ताव्याची रक्कम पुरी करून आपणास जितका ज्यास्त नफा होईल तशा रीतीनें इस्तावेदारानी आपल्या ताब्यांतील मुलखाचा कारभार करावयाचा, तेथे न्याय तो कोठचा ! खुनाचे मुकदम्याचा देखील वेळेस दंडावर फैसला व्हावयाचा. प्रांताचे इस्तावेदार आपला नफा चढवून महाल, महालचा इस्तावेदार आपला नफा चढवून ठाणी, आणि ठाण्याचा इस्तावेदार आपला नफा चढवून गांवें, इस्ताव्याने देत असत. याप्रमाणे सरकारच्या ऐन रकमेवर नफ्याची परंपरा चढून एक मोठी रक्कम होत असे, आणि त्या रकमेचा सर्व भार त्या शेतकरी लोकांवर पडत होता. पोट इस्तावेदार देखील तसेच राजाच्या व कारभारी मंडळाच्या मेहेरबानींतील जासूद, हुजरे, खिसमतगार, जामदार बैगैरे लोकांपैकी असावयाचे. सगाजी पाटील म्हणून सयाजीराव महाराज यांच्या परम कृपेतील एक जासूद होता त्यास पाटीलबोवा म्हणत. कारभाऱ्यावर देखील त्याचे वजन होतें. त्याच्या जुलमाविषयों तर लोक असे सांगतात की, त्याच्या मनुष्यानीं शेताची पाहणी करावयास निघतांना आंगरख्याच्या एका बाहींत थोडीशी बाजरी आणि एका