पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गादीवर बसण्या पूर्वीचें वर्तमान. व त्याजबरोबर मल्हारराव महाराजही गेले होते. दहनविधी आटोपल्यानंतर महाराज राजवाड्यांत आले. त्यांस या जागेचा सात वर्षे वियोग झाला होता. कांही घटकांपूर्वी जे राष्ट्राचे बंदीवान होते ते एकाएको राष्ट्राधीप झाले; हे देवाचें वैचित्र्य पाहून लोकांस मोठा विस्मय वाटला. त्याच दिवशी खंडेराव महाराज यांची राणी जमनाबाई साहेब व दुसऱ्या बायका मकरपुऱ्याहून राजवाड्यांत आपआपल्या जागी येऊन राहिल्या. जेव्हां त्यांस मकरपुऱ्याहून बडोद्यास वाटे लावल्या तेव्हां त्या बायानी पराकाष्ठेचा विलाप केला. ज्या वाड्यांत त्यांनी नाना प्रकारचे विलास केले, व राज्यसुखे भोगिली, त्या वाड्याचा त्यांस चिरकालिक वियोग प्राप्त होऊन मल्हारराव महाराज जी बरी वाईट जागा देतील त्यांत राहून अयुग्याचे दिवस घालविण्याचे त्यांचे कपाळी आलें. ज्यांचे सर्व मनोरथ खंडेराव महाराज यानी मोठ्या आनंदानें पूर्ण केले त्यांजवर आपल्या पतीच्या शत्रूच्या तोंडाकडे पाहून, ते देतील तें अन्नवस्त्र घेऊन, काळ घालविण्याचा प्रसंग गुदरला. त्या अबला स्त्रियांचा ऐश्वर्यभानु, एकाएकी अस्ताचलास गेल्यामुळे त्या अगर्दी दीन झाल्या. त्यांचे विलाप ऐकून ज्याचे अंतःकरण सद्गदित झाले नाहीं असा त्या जमलेल्या समुदायांत कोणीही नसेल. मल्हारराव महाराज वाड्यांत आल्याबरोबर त्या भोवताली त्यांच्या पूर्वाश्रमांतील मंडळी लागलीच गोळा झाली. त्यांत सभ्य व शहाणे क्वचितच होते. अशा लोकांवर राज्य- कारभाराचा भार टाकला तर कोण जाणे काय होईल, याजविषय सुज्ञ लोकांस तेव्हां- पासूनच काळजी उत्पन्न झाली. राष्ट्रास कायमचा दिवाण नव्हता. अतिंग दिवाण होता त्यास कांहीं राजकीय ज्ञान नव्हते. तसे बडोद्यासारख्या मोठ्या दरबारांत राजावर वजन पडेल असा कोणी सभ्य व मसलती मनुष्य दरबारांत कामगार नव्हता. पूर्वी सरदारांमध्ये मीर सरफराज अल्ली, नबाब साहेब, अमिन साहेब, आणि बाळोजी राजे पांढरे वगैरे मोठे चतुर पुरुष बडोद्याचे दरबारांत होते, व त्यांच्यामध्ये युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगून राजाचें मन वळविण्याचे सामर्थ्य होतें. दरकदार मंडळीमध्ये, गोपाळराव मैराळ, बळवंतराव सदाशिव रानडे बक्षी, आणि कृष्णराव जनार्दन मुनसी, हेच काय ते सभ्य व प्रौढ वयाचे होते. त्यांपैकी पहिले खेरीजकरून, दुसऱ्यांचे दरवारांत कांही विशेष वजन नव्हते, आणि गोपाळराव मैराळ यांची वृत्ति शांत, आणि राजकीय शहाणपण तितक्याच पुरते असल्यामुळे, त्यांच्या मसलतीपासून मल्हारराव महाराज यांस विशेष उप- योग होण्याचा संभव नव्हता. या सत्पुरुषाचे दरबारांत व लोकांत वजन होतें त्याची कारणे त्यांचे सत्कर्माचरण आणि संपत्तीचा सद्विनियोग हीं होती. व सोयऱ्यांत देखील राजास कान उघडून दोन गोष्टी सांगेल असा राजाचे आप्तवर्गात कोणी वडील मनुष्य उरला नव्हता.