पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १०८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. समजुतीचा मासला आहे कीं, सामान्य अकलेच्या मनुष्यास देखील त्यांच्या गैर समजुतीबद्दल हसू आल्यावांचून राहणार नाहीं. अमुक एक तक्रारीचा फैसल्ला आम्हास प्रतिकूळ झाला आहे त्याची पुनः चौकशी झाली पाहिजे अशी तक्रार केल्याने परराज्यसंबंधी सर्व व्यवहार इंग्रज सरकारच्या हातांत राहील, हा करार रद्दी कागदाप्रमाणे होत असेल तर हिंदुस्थानांतील सर्व संस्थाने हा करार मोडल्याच्या दोषास पात्र होतील, आणि कर्नल फेर यांजखेरीज देशी राज्याच्या दरबारांतील रेसिडेंट आणि पोलिटिकल एजंट याणी एका मोठ्या महत्वाच्या गोष्टीकडेस दुर्लक्ष करून संस्थानिकांचा येवढा मोठा अतिक्रम सरकारच्या कानावर न नेल्याबद्दल सर्वांकडेस एक मोठा दोष लागू होऊन ते सर्व नालायक आणि कर्नल फेर साहेब मात्र देशी राजाच्या दरबारांतील रेसिडेन्सीच्या हुद्यास योग्य असें होईल; कारण कीं, आपल्या मध्यस्थीवांचून हिंदुस्थानांतील संस्थानिकांनी राजकीय संबंधों कोणताही व्यवहार परस्पर करूं नये, हे इंग्रज सरकारच्या हिंदुस्थानांतील राज्य घटनेच्या मूलतत्वांपैकी एक मुख्य तत्व आहे, आणि त्याजवर त्यांच्या राज्याचा विशेष टिकाउपणा अवलंबून राहिला आहे, यामुळे त्याबद्दलचा अतिक्रम ते तिळमात्र देखील सहन करणार नाहींत, आणि कर्नल फेरच्या म्हणण्याप्रमाणे तर तो सर्व संस्थानि- कांकडून होतच आलेला आहे. तेव्हां यांत त्यांच्या समजुतींत कमीपणा आहे किंवा गायकवाड सरकारानी व हिंदुस्थानांतील इतर देशी राजांनी एखाद्या वादाच्या निकालावर तक्रार घेतली ह्मणजे त्यांजकडेस केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा दोष येतो याचा विचार वाचकांनीच करावा. साधारण मनुष्याला जी गोष्ट सहज समजण्यासारखी होती ती कर्नल फेर साहेबा- सारख्या राज्याधिकारविशिष्ट पुरुषास कशी समजली नसेल असें मनांत आणिले म्हणजे त्यांतून असे निष्पन्न होते कीं, त्याणी मुद्दाम गायकवाडाच्या राज्यकारभारावर भलभलतेच आरोप आणिले होते. बरें ज्या कलमाच्या संबंधाने गायकवाडावर दोष आणिले होते, त्यांचा त्या कलमाशीं कांहीं अर्थाअर्थी संबंध नाहीं हें त्यांस समजलें नव्हते असें जर गृहित करावे तर त्यांत रेसिडेन्सीच्या हुद्याविषयीं त्यांची नालायकी ध्वनित होते. मिळून कोणता तरी एक दोष त्यांजकडेस येतोच. गायकवाडी राज्याच्या जमा आणि खर्चाच्या संबंधाने रेसिडेंट साहेब यांची देखरेख असावी अशाबद्दल जे कलम सर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन साहेब यांच्या पत्रांत आहे. हल्ली अमलांत नाहीं. तें अमलांत आणावे याबद्दल कर्नल फेर साहेब यांचे म्हणणे संयुक्तीक आहे की काय याचा आपण येथे थोडासा विचार करूं. पूर्वी राज्याचे एकंदर उत्पन्न काय आणि खर्च काय याबद्दल रेसिडेंटास माहिती देण्याची वहिवाट होती, व एखादा नवीन मोठा खर्च करण्याचा असला ह्मणजे त्याबद्दल गायकवाडास रेडिडेंट साहेब यांचा विचार घ्यावा लागत असे ही गोष्ट खरी आहे, व आलीकडे पुष्कळ वर्षांपासून त्याप्रमाणे वहिवाट चालत नाहीं हेंही खरे आहे, परंतु पूर्वी त्या संबंधानें रेसिडेंट साहेब यांचे पहाणे कां होतें, आणि आलीकडे कां नाहीं याबद्दल थोडीशी हकीकत सांगितली पाहिजे.