दादासाहेब यांस रक्ताचा टिळा लावून गादीवर बसवावे७[१]. असे बोलून फडावर जाऊन मुत्सद्दी वगैरे यांची कचेरी केली. आणि चौघडे वगैरे वाद्ये सुरू जहाली. अशी खुषी वाड्यांत मंडळीस जहाली. व सौा आनंदीबाई यांणी साखरा वाड्यांत वांटिल्या. नंतर चार घटकांनी दिल्लीदरवाजा उघडला. ते वेळेस कैलासवासी यांची स्त्री सौ गंगाबाईसाहेब प्रातःकाळी आपले माहेरी८[२] गेली होती. ती दरवाजा उघडतांच धावत आली. आणि नारायण राव साहेब पडले होते तेथे येऊन बसली. आणि सती जाण्याचा मनोदय दिसून आला. तो इतकियांत भवानराव प्रतिनिधीही वाड्यांत आले. तो सरकारचे बरोबर प्रतिनिधी सहीत हजार माणसें नागव्या तरवारी करून फडावर९[३] आले. आणि दादासाहेब यांस बोलले की, "तुम्ही पेशव्यांचे कुळीं जन्म घेऊन हें कर्म अघटित केलें. हे फार वाईट!" असे नाना प्रकारचें बोलून म्हणाले की "तुमचें तोंड पहावयाचें नाहीं." इतकें बोलून माघारी आले. नंतर त्रिंबकराव मामा हे वाड्यांत येऊन दादासाहेब यांस पुसलें कीं, "नारायणराव याचा मुर्दा आहे त्याचा विचार काय आपण धरिला! व आपण जे केले ते चांगले केले!" तेव्हां दादासाहेब यांणी सांगितले, "याचे दहन करावें." त्यावेळेस कोणी ब्राम्हण येईना१०[४]. दहशतीमुळे भयाभीत जाले. तेव्हां दादासाहेब बोलिले की, "कसेही करून याचें दहन करावे." मग मामा बाहेर येऊन पांच तेलंग बोलावून पांच रुपये हातावर ठेविले, वाड्यांत घेऊन आले. तो गंगाबाईचा निश्चय बरोबर जाण्याचा पाहून आनंदीबाई यांस बहुत संतोष जहाला. नंतर गंगाभागिरथी पार्वतीबाईसाहेब, भाऊसाहेब यांची बायको, यांजला विचार कळतांच गंगाबाईस बोलली की, "तुजला वेड लागले! बहुत करून कुळक्षय गर्दीत जहाला. तुझी पाळी चुकली आहे. ईश्वर करूं लागल्यास राईचा पर्वत करील." अशा गोष्टी नाना प्रकारे करून सांगितल्या. परंतु मानीना. तेव्हां हाती धरून खोलीत घातली. आणि बाहेरून कडी लावली. आणि जवळ आपण बसली. मामांस सांगितले की, "मुर्दा न्यावा." या प्रमाणे काकूबाईंनी सांगितले. कारण पार्वती काकूबाई ही
- ↑ रक्ताचाटिळा लावण्याची वहिवाट उदेपुरास आहे. असो. दादांस टिळा गारद्यांनी लाविला असे दुसऱ्या ग्रंथांत आढळते.
- ↑ साठे तपकीर गल्लीतील.
- ↑ सरकारी काम चालण्याची जागा. सेक्रेटारिअट.
- ↑ खांसे श्रीमंत अशा तऱ्हेने पडले असतां त्यांस वाहून नेण्यास त्यांचे अन्न खादलेल्या ब्राम्हणांतून वेळीं एकही उपयोगी पडूं नये या उपर आणखी लज्जेची गोष्ट कोणती? असो. पिठाचा नारायणराव करून त्याजबरोबर एक महत्वाचा कागद प्रथम जाळला, नंतर नारायणरावाचे शव नदीवर नेलें, असें ऐकिवांत आहे त्यास येथें आधार नाहीं.