Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)
श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर

ते मारूं देणार नाहीत. कदाचित ते धरतील." मग तेथून नारायणरावसाहेब व चापाजी टिळेकर हे दोघेजण दिवाणखान्यांतून उतरून थोरले चौकांत आले. तो त्यांची पूजेची गाय मध्ये आली. तो तिकडून खरगसिंग व सुमेरसिंग व तुळाजी पवार हे तिघेजण पाठीमागे तरवारा नागव्या करून धावत आले. तो पुढे गाय देखिली आणि गाय ठार मारिली. तो इतक्यांत धांवत नारोबा फाटक[] पुढे आला. त्याजला तोडून टाकतात तो पर्यंत नारायणरावसाहेब जेथे दादासाहेब बसले होते तेथें धांवत जाऊन गळ्यांत मिठी घातली. आणि बोलूं लागले की, "आतां मला वांचवावें." इतक्यांत पवार व जमादार जवळ येऊन भिडले. दादासाहेब यांणी 'थांबा' म्हणोन हात केला. मग ते बोलले की, "आतां याला वाचवूं! हा उद्यां आमची मुले माणसे ठार मारील. 'मारावा' अशी अक्षरें तुमचे हातची आहेत. आतां थांबा कसे म्हणतां? पुढे लोटून द्यावा नाही पेक्षां दोघांस ठार मारूं." असे बोलून नारायणराव साहेब यांजवर हात टाकिला. तो दादासाहेब याची पागोट्याची कंगणी[] तुटली. हे पाहून दादासाहेब भयाभीत जहाले. गळ्याजवळचा हात सोडून पुढें लोटून दिला. तो चापाजी[] टिळेकर याने नारायणराव साहेब यांचा बंदोबस्त करावा म्हणोन आंगरख्यासुद्धां आंगावर पडला. मग बोलला की, "आधीं मला मारावें." असे ह्मणतांच तुळाजी पंवार यांणे दोघांचेही तीन तुकडे केले. इतक्यांत राजश्री इच्छाराम ढेरे हुजूरचे पागेदार पुढे आले. त्यास तेथेच ठार मारले, गर्दी वाड्यांत जाली.
 हे वर्तमान शहरीत कळले की, नारायणराव साहेब यांस गर्दी करून धरिले. मग सखाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस व हरिपंत फडके व राघोपंत सीतकार [?] व राघोजी आंग्रे असे एकत्र मिळून दरवाज्यापाशी आले. तो फौज फार दरवाज्यापाशी जमली. तो दरवाजे बंद. वाड्यांत जाण्यास रस्ता नाही. आंग्रे यांणी सांगितले मोठी शिडी लावून दरवाजा पाडावा आणि नारायणराव साहेब यांस सोडवावें. इतक्यांत दरवाजेकरी याणें हाक मारली कीं, "दरवाजे कशास फोडतात. नारायणराव यास ठार मारिलें." हे ऐकतांच सर्व मुत्सद्दी व आंग्रे श्रमित[] होऊन आतां वाडयांत जाऊन काय करावें? दादासाहेब यांस कसेही करून धरावें.
 मग झाडून सारे तमाम मुत्सद्दी एक ठिकाणी बसून विचार केला की, आत


  1. नारोबा हा शिष्या होता.
  2. कंगणी= वरल्या पट्या.
  3. टिळेकर यांस यखतपूर ता. पुरंदर हा गांव इमाम आहे.
  4. श्रमित= श्रमी= दुःखित.