पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठ उपोद्धात. दैनिक गतीनें मापलेल्या प्रदेशाचे बत्तीसपट पृथ्वीलोक पसरला आहे, त्याचें भोंवती दुप्पट मापाचा समुद्र आहे, त्याच्या पलीकडे क्षितिज वत्र्याच्या धारेइतकें किंवा माशीच्या पंखा- इतकें बारीक आहे. तेथपर्यंत अश्वमेधयाजी जीवात्मे पक्षिरूपानें इन्द्र घेऊन जातो, आणि. त्या बारीक क्षितिजांतून त्यांस वायु आपलें रूप देऊन पलीकडे नेतो. तो वायु व्यष्टिसमष्टिरूप मनांत आणिला असतां मृत्यूपासून मुक्ति होते. ब्राह्मण ४. उपस्त चाक्रायण ऋषीनें सर्वांच्या अभ्यन्तरीं सर्वान्तर आत्मा कसा आहे ? हें विचारल्या- चरून, याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें कीं, तो दृष्टीला दृष्टिरूप देणारा, श्रोत्रांना श्रवण करविणारा, मनाचें मनन करणारा, बुद्धिजन्य ज्ञानाचें ज्ञान उत्पन्न करणारा असल्यामुळे तो आत्मा पाहतां येत नाहीं, ऐकतां येत नाहीं; त्याचें मनन करितां येत नाहीं; अथवा त्याचें स्वरूप- ज्ञान होणें शक्य नाहीं. " ब्राह्मण ५. व मग कुषीतकपुत्र कहोल ऋषीनें पुनः ज्याचें प्रत्यगात्म्यास प्रत्यक्ष व मुख्य ज्ञान होतें,, व जो सर्वान्तर ह्मणविला जातो, तो कसा आहे ? असे विचारल्यावरून याज्ञवल्क्यानें सांगितलें कीं, तो देहसंबंधजनित भूक, तहान, शोक, मोह, जरा व मृत्यु यांचे पलीकडे आहे. असा तो विकारातीत आत्मा जाणला ह्मणजे ज्ञानसंपन्न ब्राह्मण पुत्रैषणा, वितैषणा व लोकैषणा टाकून देऊन, केवळ शरीरयात्रा चालवण्याकरितां भिक्षावृत्ति धरून, पूर्ण पांडित्य, अंगी आणून, बालस्वभावानें राहूं इच्छितात; व मौन आणि मौनाभाव ह्मणजे आत्मज्ञान व अनात्म वस्तूंची उपेक्षा धारण करून कसा तरी काळ कंठितात. ही उच्च भावना उत्पन्न झाली झणजे. बाकी सर्व वस्तु नश्वर आणि दुःखयुक्त आहेत असें स्पष्ट दिसूं लागतें. ब्राह्मण ६ नंतर गार्गीनें सर्व वस्तूनां उदक व्यापून आहे, त्या उदकाला व्यापून कोण आहे ?? असे विचारलें. ज्याप्रमाणें सर्व जड वस्तु उत्पन्न होण्यास उदक कारण आहे, त्याप्रमाणें उदकाचें कारण वायु आहे; वायूचें कारण आकाश आहे; आकाशाचें कारण सूक्ष्मरूपाने असणारे गन्धर्वीचें वसतिस्थान आहे; गन्धर्व लोकांला कारण आदित्य लोक ( सूक्ष्म प्रकाशत्व ) आहे; आदित्य लोकाला कारण त्याहून सूक्ष्म चन्द्र प्रकाश आहे; चन्द्रलोकाला कारण त्याहून सूक्ष्म नक्षत्र प्रकाश आहे. नक्षत्र लोकाला कारण देवांचें तेज अथवा देवलोक आहे. देवलोकाला. कारण इन्द्रलोक ( सूक्ष्म क्रियाशक्ति ) आहे. इन्द्रलोकांला कारण प्रजापति लोक ( गूढ अव्यक्त उत्पादनशक्ति ) आहे. प्रजापति लोकाला कारण ब्रह्म लोक ( अव्यक्त ईश्वरशक्ति ) आहे. ह्याप्रमाणें प्रश्नानुक्रमानें याज्ञवल्क्यानें उत्तरें दिलीं. तरी पुनः गार्गीनें विचारले की, त्या ब्रह्मलोकाला ( अव्यक्त ईशशक्तीला ) व्यापक काय आहे ? तेव्हां याज्ञवल्क्यानें ही देवता अनुमान पद्धतीनें जाणण्यासारखी नाहीं. श्रुतीनेंच समजण्यासारखी आहे, असें असून तूं विचारशील तर तुझें डोकें फुटून जाईल, असे सांगितलें