पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अखेरचा रामबाण सत्याला स्मरून सुटला. पक्षपाती वार्ता आम्ही प्रसारित करणार नाही,' असे सरकारी मालकीच्या रेडिओ-टेलिव्हिजन कर्मचाऱ्यांनी जाहीर कल्यामुळे द गॉल सरकारची प्रचार आघाडीच कोसळली. चुकीचा मथळा देऊ देण्यास कामगार-कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली म्हणून पॅरीसचे सर्वाधिक खपाचे ‘ला पॅरिशिअन लिबरे' हे प्रभातदैनिक प्रसिद्ध होऊ शकले नाही. आमच्या सदसद्विवेकबुद्धीला क्लेष होतील असे कृत्य करण्याची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका, असे पोलीस संघटनांनी शासनाला कळविल्यावर तर ही केवळ विद्यार्थ्यांची, कामगारांची, एखाद्या पक्षाची चळवळ नसून समग्र फ्रेंच जनतेचा हा नैतिक उद्रेक आहे, कुठली तरी खोल मानवी व्यथा येथे चित्कारून उठली आहे, बऱ्याच काळ कोंडल्या, दडपल्या गेलेल्या भावनांना ही वाट सापडली आहे. एका राजवटीची ही केवळ मृत्युघंटा नसून पश्चिमेने प्रमाण मानलेली मुल्येच येथे उन्मळून पडत आहेत, हे स्पष्ट झाले. फ्रान्सपूर्वी पश्चिम जर्मनीत हे घडले. फ्रान्सपाठोपाठ स्पेनमध्ये हे घडले. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, इटली, ब्राझील, अमेरिका, जपान, इजिप्त, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया-कुठे ही लाट उसळायची राहिली आहे !

या लाटेचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आम्ही सगळे बेडेकरांच्या गच्चीवर दोन तास चर्चा करीत होतो.
विद्यार्थी सांगत होते : ' आम्हाला भांडवलशाही नको, कम्युनिझम हवा,' असा या लाटेचा आवाज आहे.

मी म्हणत होतो : ‘डॅनी दि रेड' ज्याला गरुस्थानी मानतो त्याची शिकवण वेगळी आहे. मार्क्युजचे सांगणे आहे- To-day individuals are dominated and manipulated by big institutions of Government and business. Man has the obligation to oppose them'-' आज व्यक्ती ही प्रचंड संघटनांच्या हातचे बाहुले बनली आहे. संघटनांचे व्यक्तिजीवनावरील हे आक्रमण थोपविणे प्रत्येक मनुष्यमात्राचे कर्तव्य आहे.'

डॅनी आणि त्याचे जगभरचे साथी हे कर्तव्य तर बजावीत नसतील ?

*

जून १९६८

। ८७ ।