पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घाटींच्या मेजावर यावे लागले असले तरी विद्यार्थी आपली आघाडी सोडायला काही तयार नव्हते.

-लिअॉन्स येथे एका पोलीस कमिशनरच्या अंगावर दगडाने भरलेला ट्रक घालून विद्यार्थ्यांनी त्याला ठार केला.

-भांडवलशाहीचे प्रतीक असलेल्या पॅरीसच्या शेअर बाजारावर हल्ला चढवून विद्यार्थ्यांनी तेथे जाळपोळ केली.

-फ्रेंच सेनेटरवर बाँब्स फेकले.

-कामगारवर्गाने साथ द्यावी म्हणून विद्यार्थ्याच्या झुंडी काही कारखान्यांपर्यंत चालत गेल्या.

कामगारांनी साथ दिली; पण फार सावधपणे. 'आमच्यात लुडबुड करू नका' अशा काही ठिकाणी कामगारांकडून विद्यार्थ्यांना कानपिचक्याही मिळाल्या. 'अती जहाल विद्यार्थीचळवळींपासून दूर रहा' असे कामगारनेत्यांकडून आदेशही सुटले. 'स्टॅलीनचे संधीसाधू बगलबच्चे' हा घरचा आहेर विद्यार्थ्यांनीही इमानेइतबारे कामगारनेत्यांपर्यंत पोचविला.

अहोरात्र मंत्रिमंडळाच्या बैठका चालू होत्या. कामगार नेते आणि पाँपेदू मंत्रिमंडळ यांच्या वाटाघाटी संपतच नव्हत्या. पंचवीस मेला अखेरीस उभयपक्षी मान्य झालेली तडजोड कामगारांच्या गळी उतरविण्यासाठी सी. जी. टी. या प्रचंड कम्युनिस्ट संघटनेचे नेते जॉर्ज सेगू बिलिनकोर्ट येथील रेनॉल्ट कारखान्याकडे धावले. पण कामगार नमायला तयार नव्हते. संध्याकाळच्या पन्नास हजारांच्या विद्यार्थी-कामगारांच्या संयुक्त सभेत 'द गॉल चालते व्हा' बरोबर 'सेगू चालते व्हा, विश्वासघात करू नका' अशा घोषणा दुमदुमल्या तेव्हा सगळ्यांचीच डोकी गरगरायला लागली. दहा लाख सभासदसंख्या असलेल्या कामगार संघटनेच्या नेत्याची यावेळची ही अवस्था पाहून एक समाजवादी विचाराचा स्तंभलेखक आपल्या समाजवादी विचारसरणीच्या साप्ताहिकात लिहितो, 'It was a most pathetic sight, most pathetic-ते दृश्य फार केविलवाणे होते, फार केविलवाणे.' विद्यार्थ्यांना काय हवे ते कामगारांना कळत नव्हते, कामगारनेते कामगारांना समजू शकत नव्हते, द गॉलची राजवट तर साऱ्या फ्रेंच जनतेपासून दूर दूर गेली होती. इकडे कम्युनिस्ट कामगारसंघटनेचा चिटणीस राजीनामा देत होता. तिकडे द गॉलच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री बाहेर पडत होते. या गदारोळात सगळेच उलथेपालथे होत होते, जवळचे समजले जाणारे दुरावत होते. दूर वाटणाऱ्यात अचानक जवळीक निर्माण होत होती.

। ८६ ।