पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कम्युन्स आणि ग्रामराज्ये



'फ्रान्समधील घटनांची भारतात पुनरावृत्ती होणार नाही' असे काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात अस्वस्थचित्त सभासदांना मोरारजीभाई देसाई छातीठोकपणे सांगत आहेत.

'राज्यकर्त्यांनी येथील असंतोषाची, वैफल्याची दखल घेतली नाही, तर पॅरीस काही दूर नाही,' असा कॉम्रेड मिरजकर यांचा एका जाहीर सभेतील इशारा आहे.

दि. के. बेडेकरांच्या गच्चीवर, आणखी एका संध्याकाळी मी आणि काही मार्क्सवादी विद्यार्थी, पॅरीसमध्ये नेमके घडले तरी काय याचा कसून शोध घेण्याचा पुन्हा एकदा मनःपूर्वक प्रयत्न करीत आहोत.

'विद्याथ्र्यांनी दंगली केल्या, कामगारांनी संप पुकारले, यापेक्षा फ्रान्समध्ये यावेळी एक वेगळी घटना बऱ्याच प्रमाणात घडलेली दिसते, ती कोणती ?' मी विद्यार्थ्याना खोदून खोदून हा प्रश्न विचारीत आहे.

बऱ्याच वेळानंतर, एक अगदीच कोवळ्या वयाचा तरुण मला सांगत आहे,' कम्युन्स! फ्रान्समधील विद्यार्थ्यांनी आणि कामगारांनी यावेळी बऱ्याच ठिकाणी 'कम्युन्स' स्थापन केलेली आहेत.'

मला हवे ते उत्तर मिळते. माझा पुढचा प्रश्न असतो-
'कम्युन्स'चा अर्थ काय ?'
मला चटकन उत्तर मिळतं- ‘सर्व समाईक मालकीचं.'
'एवढाच ' कम्युन्स' चा अर्थ असेल तर अशी 'कम्युन्स' आपल्याकडेही सर्वोदयवाद्यांनी पूर्वी स्थापन केलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावातून अशी व्यवस्था आजही आहे. खाणे-पिणे-रहाणे सर्व सामायिक. कोणाची मालकी कशावरच नाही. मग ही सर्वोदयाची ‘ग्रामराज्ये' आणि पॅरीसची ‘कम्युन्स' यात काही साम्य तुम्हाला आढळते का ? 'मी.

'मुळीच नाही. सर्वोदयाचे विचार अगदी जुनाट आहेत. ग्रामराज्ये म्हणजे औद्योगिक क्रांतीपूर्वीची जुनी व्यवस्था टिकवून धरण्याची दुबळी धडपड आहे.' विद्यार्थी.

। ८८ ।