पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बालसंगोपन, कुटुंब-नियोजन इत्यादी विषयांवर नवसाक्षर भगिनींची भाषणे ठेवण्यात आली होती, तीही ठीक वठली. यानंतर समूहगीतांचा कार्यक्रम. दोन-तीन गीतांपैकी एका गीताने तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अक्षरओळख नसल्याने किती अडचणी उभ्या राहतात याचे वर्णन करताना एक बाई म्हणते-

 ‘पत्र आलं बंधवाचं वाचायला येईना।
 नेऊ कुठे वाचायला वाचनार भेटना ।
 गावाला मी जाते कुण्या मोटारीच समजंना |
 पाटी हाय तिच्यावर वाचायला येईना ।
 साताऱ्या ग शहरामंदि पेट मला घावना ।
 खोलीचा ग नंबरय वाचायला येईना ।

 रात्रीच्या ग शाळा सुरू झाल्या आता गावाला ।'...
समूहगीतांच्या या कार्यक्रमानंतर राज्यपालांच्या शुभहस्ते साक्षरतेची ज्ञानज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली व शिक्षणाची ही ज्योत जिल्ह्यातील सर्व भागात पोहोचविण्यासाठी उपस्थित अधिकारीवर्गानेही आपापल्या ज्योती ह्यावर प्रदीप्त करून घेतल्या. थेट गावापर्यंत या ज्योतीचा प्रकाश पोहोचावा यासाठी, खेड्यापाड्यांतून आलेल्या असंख्य नवसाक्षर बंधु-भगिनींनी आपापल्या ज्योती प्रज्वलित करून हाती घेतल्या आणि भवानीचे नामस्मरण करून सर्वच उपस्थितांनी 'शिक्षणाची ही पवित्र ज्योत आम्ही अशीच अखंड तेवत ठेवू' अशा अर्थाच्या प्रतिज्ञा घेऊन समारंभाला एक आगळेच गांभीर्य प्राप्त करून दिले. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेला कामाचा आढावा, राज्यपालांचे समयोचित भाषण, नवसाक्षर प्रौढाने केलेला समारोप, वंदेमातरम् वगैरे नेहमीच कार्यक्रम यापुढे थोडक्यात आटोपल्याने सभेच्या अखेरपर्यंत या गंभीर वातावरणाचा परिणाम कमी झाला नाही. प्रतापगडाच्या पराक्रमी परंपरेला साजेसाच हा नवमहाराष्ट्रातील विधायक कार्यकर्त्यांचा समारंभ होता, एवढे यासंबंधी सांगितले म्हणजे पुरे आहे.

पूर्वीची लादलेली साक्षरता

तसे पाहिले तर साक्षरतेची चळवळ सातारा जिल्ह्यात नवीन नाही. गेली बरीच वर्षे साक्षरतेचे वर्ग तुरळकपणे खेड्यापाड्यांतून चालू होते. पण या वर्गाचे अनुभव फारच निराशाजनक होते. वर्ग भरविण्याची जबाबदारी एकट्या प्राथमिक शिक्षकावर पडलेली होती. बिचारा प्राथमिक शिक्षक 'वर्गास या'म्हणून सर्वांना विनंत्या करून थकून जात असे. मोठ्या कष्टाने जमवलेल्या काही मंडळींना पदरचे रॉकेल तेल जाळून ' ग, म, भ, न' शिकवीत असे. ग्रामस्थांना माणसे जमविणे हे मास्तरांचे

। २ ।