पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जिल्हा लिहू लागला !
जिल्हा वाचू लागला !


साऱ्या महाराष्ट्रात यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली हे खरे; पण प्रतापगडावर १७ एप्रिलला (१९६१) उत्सवाचा जो समारंभ साजरा झाला, तो अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असाच म्हणावा लागेल. या समारंभात केवळ शिवरायांची पोकळ स्तुतिस्तोत्रे गाऊन वेळ भागवून नेण्याची दृष्टी नव्हती; तसेच उत्सवापुरत्या जाग्या होणा-या पुढारी मंडळींचा हा काही एक उरूस नव्हता. सारा सातारा जिल्हा साक्षर करण्याच्या पवित्र उद्देशाने जे कार्यकर्ते गेले २-४ महिने अहोरात्र परिश्रम घेत होते, त्यांनी आपल्या कामाची प्रत्यक्ष वानगी येथे थोडीबहुत दाखविली, हे या समारंभाचे विशेष महत्त्व होते. झालेले काम अपेक्षेच्या मानाने फार अपुरे आहे, याची जाणीव ठेवून नव्या उद्दिष्टांच्या प्रतिज्ञाही महाराष्ट्राच्या या तीर्थक्षेत्रावर अनेकांनी घेतल्या, यामुळेही या समारंभाच्या वैशिष्ट्यात अधिक भर पडली. थोडक्यात म्हणजे हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा व कर्तव्यदक्ष सरकारी अधिका-यांचा एक मेळावा होता. शिवरायांच्या क्रियाशील जीवनापासून नव्या काळाला अनुरूप असा बोध घेणा-या शिवभक्ताची ही एक कामकाजाची बैठक होती.

 सकाळपासून गडावर उत्सवासाठी मंडळी जमू लागली होती. आसपासच्या सुमारे पन्नास पाऊणशे गावातून तरी लोकांची रीघ लागलेली होती. सकाळीच सनईवादन, भवानी देवीची पूजा, शिवप्रतिमेचे पूजन इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले होते. दुपारी चारच्या सुमारास राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांचे आगमन झाले व एकेका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने सभेच्या कामास सुरुवात झाली. सर्वच सभा नवसाक्षरांनी गाजवली. टेकवली येथील नवसाक्षर भगिनी बाबीबाई कोळगणे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली, तर जावळीचे नवसाक्षर प्रौढ श्री. मोरे यांनी तिला अनुमोदन दिले. स्वागतपर भाषण, अहवालवाचन हे कार्यक्रमही नवसाक्षर मंडळींनीच पार पाडले. महाबळेश्वर कलापथकाचे 'जिल्हा लिहू लागला; जिल्हा वाचू लागला' हे अभिनयगीत तर राज्यपालांनाही फार आवडले. पुढे शेती, अस्पृश्यता,