पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामच आहे असे वाटे, तर जमलेले प्रौढ आपण शिकतो म्हणजे मास्तरावर मोठे उपकारच करतो या भावनेने वर्गातील वागणूक ठेवीत असत. या वर्गाना सामूहिक असे कुठलेच स्वरूप नव्हते. शिक्षणखात्यामार्फत वर्ग चालविण्याबद्दल प्रत्येक नवसाक्षरामागे शिक्षकाला चार रुपये वेतन मिळत असे म्हणून तो काम करीत असे; तर 'मास्तर मागे लागला आहे; अधूनमधून जाऊ या झालं ! बिचाऱ्याचे चार रुपये कशाला बुडवा !' अशा पोक्त विचाराने गावकरीही कधीकधी एकत्र जमत असत. शिक्षकाच्या उत्पन्नवाढीचा एक खाजगी मार्ग, एवढेच या चळवळीचे अखेरचे रूप शिल्लक राहिले होते. म्हणून सर्वत्र निराशा होती; अनास्था होती; चालढकल होती; खोट्या नोंदी होत्या; चळवळ बंदच करून टाकावी अशी मनःस्थिती होती

साक्षरता चळवळीत बदल

वैचारिकदृष्ट्या या अपयशाचे मूळ साक्षरतेच्या कल्पनेत आहे, हे काही विचारवंतांनी दाखवून दिल्यानंतर चळवळीच्या स्वरूपात पुढे हळूहळू बदल करण्यात आला. खेड्यातला प्रौढ केवळ अक्षर ओळख करून घेण्यास फारसा उत्सुक नसतो; परंतु त्याला शेती, आरोग्य, नियोजन इत्यादी उपयुक्त विषयांवर जर चौफेर ज्ञान देण्याची व्यवस्था केली, तर तो आजची अनास्था टाकून आपणहून शिक्षण घेण्यास पुढे येईल, अशा कल्पनेने साक्षरताप्रसार चळवळीला प्रथम ‘लोकशिक्षण' व नंतर 'समाजशिक्षण' चळवळीचे स्वरूप देण्यात आले. साक्षरतेमध्ये अक्षरओळख व लिहिणे-वाचणे एवढ्याचाच समावेश होतो. लोकशिक्षणामध्ये अधिक व्यापकता आहे. लिहिणे, वाचणे व त्याबरोबर इतर सामान्यज्ञान लोकशिक्षणात दिले जाते. परंतु लोकशिक्षणामध्ये एकात्मतेची व सामूहिक ध्येयवादाची बीजे नसल्याने हाही पर्याय अपयशी ठरला व त्यातूनच समाजशिक्षणाचा ध्येयवाद उत्क्रांत झाला. समाजशिक्षणामध्ये व्यक्तिविकासापेक्षा समाजविकासाचे ध्येय पुढे ठेवलेले असते. सामाजिक ध्येयवादाच्या आकर्षणामुळे सारा गाव जागा होईल, 'शिक्षण द्या' म्हणून सुशिक्षितांच्या मागे लागेल व त्यामुळे गावच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची चक्रेही वेगाने फिरू लागतील, अशा अपेक्षेने समाजशिक्षणाचे काम हाती घेण्यात आले.

परंतु चळवळीच्या वैचारिक कक्षा विस्तृत झाल्या होत्या, तरी प्रत्यक्ष संघटनेत कसलाही मूलगामी बदल त्याबरोबर घडून न आल्याने साक्षरता-प्रसाराचे वर्ग एवढेच तिचे स्वरूप कायम राहिले होते. गावाला ध्येयवादाची मिठी पडत नव्हती व शिक्षणकार्याला अपेक्षित असा नवीन उठाव काही लाभत नव्हता. जुनेच वळण, जुनेच दळण चालू होते.

। ३ ।