पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'फ्रान्समध्ये गेल्या दहा वर्षांत भरपूर सुबत्ता नांदत होती. महागाई होती; पण बेकारीचे प्रमाण काळजी करण्यासारखे नव्हते. अमेरिकेसारख्या धनाढ्य भांडवल शादी राष्ट्राला शह देऊन द गॉलने फ्रान्सची प्रतिष्ठाही खूप उंचावली होती फ्रान्सने ज्यांचा नक्षा उतरवला त्यांनी या असंतोषाला खतपाणी घालून द गॉलवर आपला सूड उगवला, अशीही एक कारणमीमांसा आहे, ती कितपत बरोबर वाटते ! ' मी.

'सुबत्ता ही समाजवादाचा पर्याय ठरू शकत नाही. सुबत्ता असली तरी फ्रान्समध्ये विषमता होतीच.' विद्यार्थी.

'खवळलेल्या विद्यार्थ्यांना समाजवादच हवा होता अशी तुमची खात्री आहे का ? कारण इंग्लंडमध्ये समाजवादी राजवट असूनही तिथला विद्यार्थी खवळतोच आहे. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' वर कुणी तरी क्रांतीचा झेंडा फडकवला आहे. लंडनमधील फ्रेंच वकिलातीसमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केलेली आहेत.' मी.

'इंग्लंडमध्ये समाजवाद आहे असे आम्ही मानीत नाही.' विद्यार्थी.

'मग पॅरिसमधल्या बंडखोर विद्यार्थ्यांना हवा असलेला समाजवाद कुठला? समाजवाद म्हटला तरी त्याचा नमुना काही एकच नाही. हिंदुस्थानातही समाजवाद आहे. असं म्हटलं जातं. पूर्वयुरोपात, रशियातही समाजवादाची निरनिराळी रूपे आहेत. यापैकी नेमकं कुठलं रूप पॅरिसमधल्या बंडखोरांना अभिप्रेत आहे ? ' मी.

'तसं काही सांगता येत नाही ; पण बंडखोरांच्या हातात विळाकोयत्याचा लाल झेंडा होता यावरुन त्यांना कम्युनिझमकडे जायचे आहे हे स्पष्ट होते.' विद्यार्थी.

'बंडखोरांच्या हाती लाल झेंड्याबरोबरच अराज्यवादाचे (Anarchy) काळे झेंडेही खूप होते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.' मी.

'विद्यार्थ्यांना डावीकडे जायचे आहे एवढे तरी स्पष्ट आहे. अराज्यवादाची परंपरा फ्रान्समध्ये जुनी असल्याने काहींनी काळे झेंडे नाचवले असतील.' विद्यार्थी.

'मार्क्सच्या बरोबरीने अलीकडे पॅरिस-बर्लिनमधल्या विद्यार्थीवर्गावर मार्क्युजच्या (Marcuse) विचारांचा पगडा आहे याचा उलगडा काय ? आणि हा मार्क्युज तर यंत्रसंस्कृतीच्या मुळावरच आघात करतो. आजकालच्या यंत्रसंस्कृतीने माणसाला गुलाम केलेले आहे असे त्याचे मत आहे. डावीकडे जायचे आहे एवढे नक्की असले तरी कशाच्या डावीकडे हाही प्रश्न आहेच. मार्क्युजचे भक्त तर मार्क्सच्याही डावीकडे जाऊ इच्छितात असे दिसते.' मी.

। ८० ।