पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पॅरिस आणि पुणे


वेळ संध्याकाळची. एक शनिवार. दि. के. बेडेकरांच्या प्रशस्त गच्चीवर काही तरुण आणि मी 'अन्नस्वतंत्रते' विषयी चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो होतो. या तरुणांची एक छोटीशी संघटना आहे. संघटनेचे नाव काय ते विचारायचे विसरलो; पण मार्क्स हे या तरुणांचे दैवत असावे असे स्पष्ट दिसत होते. तशी संख्या फार नव्हती. सुरुवातीला चार-पाचजण होते. नंतर आणखी चार-पाचजण आले. न आलेले, येऊ न शकलेले गृहीत धरून संघटनेची संख्या तीस-चाळीसपेक्षा अधिक नसावी.

विद्यार्थी कामगारांनी पेटवलेली चळवळ आटोक्यात आणण्यासाठी द गॉलने सैन्याच्या काही तुकड्या, रणगाडे पॅरिस शहराच्या वेशीजवळ आणून उभे केले आहेत ही त्या दिवशीच्या वृत्तपत्रातील एक ठळक वार्ता होती. आमच्याकडचा विद्यार्थी यामळे किती प्रभावित झाला आहे, त्याच्या या उठावाबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याची मलाही उत्सुकता होती.

'पॅरिसमध्ये सध्या काय घडत आहे असं तुम्हाला वाटतं ?' मी सुरुवात करतो.

'महागाई, बेकारी यामुळे फ्रान्समधील कामगारवर्ग हैराण झाला आहे ! ' कोणी तरी उत्तर देतो.

'पण कामगारवर्गाने हा उठाव केलेला नाही. प्रथम विद्यार्थी खवळले. मागाहून कामगार संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली आणि विद्यार्थी फक्त फ्रान्समध्येच खवळलेला नाही. तो पूर्व युरोपतही उठावण्या करतो आहे. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हाने देतो आहे.' मी

'तरीपण महागाई, बेकारी, भांडवलशाही अर्थव्यवस्था हीच या असंतोषाची कारणे आहेत. पूर्वयुरोपातील व इतर कम्युनिस्ट राष्ट्रातील विद्यार्थी असंतोषामागील भूमिका वेगळी आहे. त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे आहे; पण समाजव्यवस्था बदलावी अशी त्यांची मागणी नाही.' कुणीएक.

। ७९ ।