पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्यकर्ते श्री. गंगाधर नलावडे यांनी सभेची सुरुवातच वेगळ्या भाषणाने केली. ते म्हणाले-

'काल दिवसभर आम्ही प्रवासात होतो. संचलन सोडल्यावर मधल्या महिन्याभरातही मराठवाड्यात कामासाठी सारखे हिंडत होतो. आम्ही संचलनासोबत काही दिवस होतो, असे कळल्यावर लोक उत्सुकतेने माहिती विचारीत. ज्या भागातून संचलन गेले तेथे तर घरच्या मंडळींची चौकशी करावी, तशा आस्थेने संचलनाच्या पुढील मुक्कामांची हालहवाल, ख्यालीखुशाली विचारली जाई. संचलन कुठवर आले, कार्यक्रम कसे होतात, मराठवाड्यात जशी लोकांनी साथ दिली, तशी इतर मिळते की नाही, सरकारवर याचा काही परिणाम होणार आहे का, संचलना नंतरचा कार्यक्रम काय, अशा अनेक शंका, प्रश्न आम्हाला विचारले जात आणि आम्हीही सुचतील तशी उत्तरे देत असू. यावरून इतके निश्चित की, निदान आमच्या भागात तरी या वेगळ्या विचारांविषयी कौतुक आहे. तो पसरावा, त्याच परिणाम दिसावेत, अशी लोकांची मनापासून इच्छा आहे. मला स्वतःला हा विचार फार पटला. यात पक्षबिक्ष काही नाही, निवडणुकांची दृष्टी नाही, म्हणून तो जास्त आवडला आणि म्हणून मी सुरुवातीलाच सामील झालो. मी स्वतः तिथे कम्युनिस्ट पक्षाचे काम करतो. माझ्याप्रमाणेच इतरही पक्षांचे कार्यकर्ते याकडे . ओढले गेल्याचे मला माहीत आहे. पुढे काय हे आज कोणीच सांगू शकणार नाही: यांनी विचाराची दिशा सांगितली, पुढची जबाबदारी वास्तविक आपली आहे- विशेषतः शेतकरीसमाजाची'...

आणखी बरेच काही नलावडे सांगत होते. त्यांच्या सांगण्यातला नवीनपणा, ताजेपणा जाणवत होता. त्यामुळे भाषण लांबले तरी ऐकावेसे वाटत होते.

यानंतर विनायकराव पाटील बोलले. शेतकऱ्यांनी जबाबदारी कशी उचलायची याचे उदाहरण म्हणून त्यांनी निफाड तालुक्यातल्या अकरा गावांची माहिती सांगितली. 'निफाड तालुक्याला वास्तविक बाहेरून धान्य आणण्याची काही गरज नव्हती, नाही. खूप पिकवणारा हा भाग आहे; पण हजारो क्विंटल परदेशी धान्य या तालुक्यात येतच होते, अजूनही येते. आमच्यापैकी अनेकजण हे धान्य स्वस्त मिळते, म्हणून गुराढोरांना खाऊ घालण्यासाठीही याचा उपयोग करतात. यात काही तरी चूक आहे, आपल्या देशाचे फार नुकसान होत आहे, याची कुणाला जाणीवच नव्हती. शिवाय आपल्या अब्रूचाही प्रश्न आहे. किती बदनामी परदेशात आपली होत आहे! म्हणून आमच्या तालुक्यातल्या अकरा गांवांनी ठरवले की, परदेशी अन्नधान्याचा एक कणही गावात येऊ द्यायचा नाही. जी काही तूट आहे ती आपापसात भरपाई करून वाटून घ्यायची. परदेशातील लहान मुलांनी आपल्यासाठी उपास काढावेत

। ७६ ।