पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की, आम्ही त्यांना विनोदाने म्हणत असू, ' जोशीबुवा, खरोखरच या लोकांनी तुम्हाला विचारायचे ठरवले तर त्यांनी तुम्हाला गाठायचे कुठे ? तुमचा ठिकाणा काय ? तुम्ही तर आज इथे उद्या तिथे. तुमचा काही कायमचा पत्ता आहे का?' पण जोशीबुवांना हे काही पटत नसे. त्यांचे आपले 'मला विचारा' हे शेवटपर्यंत चालूच राहिले. वर पुन्हा शेतकऱ्यांना हे असेच ठासून ठोकून सांगावे लागते. तुमची ' विचार करा' ही भाषा इथे चालायची नाही' हे त्यांचे आम्हालाच सांगणे असे.

यामुळे जोशीबुवांचे नाव 'खतवाले' असे पडले होते.

शेवटी मी 'शेती, उद्योगधंदे, शिक्षण या सर्वच क्षेत्रांत आज बोकाळलेली परावलंबी वृत्ती आपल्याला नष्ट केली पाहिजे. त्याशिवाय आपले कुठलेच प्रश्न सुटणार नाहीत. अन्नापासून ही सुरुवात आहे. 'परदेशी अन्न-मदत बंद करा' असे आपण सरकारला एकमुखाने सांगू-' असा समारोप करी व या आशयाचा एखादा ठराव सभेपुढे ठेवून त्याला मान्यता घेई. यामुळे ‘ मतवाले' ही पदवी मला मिळाली होती.

असे आम्ही 'पत' वाले, 'खत' वाले आणि ‘मत' वाले गावोगाव सभा घेत, नगर जिल्ह्यातील नेवाशाच्या पुढे ‘बेलपिंपळगाव' येथे पोहोचलो, तेव्हा गावातल्या ९ भिंतीवर, आम्हाला या तिन्ही शब्दांचा उपयोग करून एक म्हण मोठ्या अक्षरात लिहिलेली आढळली-

गावात एकमत

शेतात सोनखत

सुधारा देशाची पत

नुकताच यागावी ग्रामगौरवसमारंभ पार पडला होता. ग्रामगौरव म्हणजे शंभर टक्के गाव साक्षर झाल्याची निशाणी. या समारंभापूर्वी गावातल्या भिती निरनिराळ्या म्हणींनी रंगवून काढण्याचा एक कार्यक्रम बहुतेक ठिकाणी होत असतो. या म्हणीही गावकऱ्यांनी व विशेषतः गावशाळेच्या शिक्षकांनीच तयार केलेल्या असतात. महाराष्ट्रभर अशा गावातून हिंडून कोणी या म्हणी नुसत्या एकत्रित या तरी लोकसाहित्यात काही नवीन भर पडेल ; निदान स्वातंत्र्योत्तर काळातील, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासप्रवृत्तींचे काही रेखाटन तरी त्यावरून खचित करता येईल, असे काही भिंती पाहून तर तीव्रतेने वाटले.

वेल्होळीला राजाभाऊ कुलकर्णी नसल्याने घडी वेगळी बसणार, खत-पत-मताचे नेहमीचे त्रिकूट विस्कटणार याची कल्पना थोडीफार होतीच; पण नवीन घडी इतकी चांगली जमेल असेही वाटले नव्हते. संचलनाच्या सुरुवातीला काही दिवस बरोबर असलेले, नंतर गावी परतलेले व पुन्हा आज सामील झालेले मराठवाड्यातील

। ७५ ।