पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोट्यवधी रुपयांची मदत बिहारमध्ये ओतली जाऊन तेथील समाज अधिकच दीनवाणा, लाचार बनवून टाकला जात असताना, इकडे पंजाबमध्ये गहू गुरांना खायला घातला जात होता, ही विसंगती का ? हे सवाल बैठकीत उपस्थित झाले हे मला विशेष महत्त्वाचे वाटते. ही मंडळी त्यांना ग्रासणाऱ्या अन्नप्रश्नाचा असा व्यापक बैठकीवरून विचार करू लागली की, लवकरच यांचा आजचा तुटकपणा, वेगळेपणा संपेल, इतर समदुःखी उपेक्षितांना व वंचितानाही बरोबर घेण्याची गरज त्यांना भासू लागेल व स्वावलंबनासाठी ( ‘ग्रामस्वराज्य' म्हणजे तरी आजच्या संदर्भात वेगळे काय असू शकते ?) एकीकडे करावयाच्या दीर्घमुदतीच्या विधायक प्रयत्नांबरोबरच (जे प्रयत्न ही मंडळी सातपुडा सर्वोदय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गेली ५-७ वर्षे करीतच आहेत) काही अडथळे, विसंगती दूर करण्याचे अल्पमुदतीचे आंदोलनाचे मार्गही यांना हाताळावेसे वाटतील अशी शक्यता आहे. दोन्ही अंगांनी असा उठाव होत असेल तर आपणही साथ दिली पाहिजे. कारण आपल्याला तरी वेगळे काय अभिप्रेत आहे ?

'पुढे काय ?' या आपण विचारलेल्या प्रश्नाचे माझे उत्तर सध्या इतकेच. तरी बरेच सविस्तर लिहिले. कारण तुमची शंका व तगमग मी समजू शकलो. धुळ्यानंतर आता डिसेंबरात औरंगाबादला पुन्हा सर्व मंडळी एकत्रित येणार आहेत. मीही जात आहे. पुढचा मार्ग आणखी स्पष्ट झाला तर पाह्यचे. आल्यावर भेटूच. तोपर्यंत दुसऱ्या विहिरीचे ठरवून ठेवण्यास हरकत नाही. कळावे.

आपला

श्री. ग. मा.


डिसेंबर १९६७

| ६८ |
                  । ६८ ।