पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




चला....


 आपला देश गरीब आहे हे एक सत्य आहे.
 आपला देश ‘ मागासलेला' आहे हे एक अर्धसत्य आहे.

आमचे उद्योगधंदे मारून, पुन्हा ते कधीही वर येऊ नयेत म्हणून इंग्रजांनी 'हा देश शेतीप्रधान आहे ' हा भ्रम दीडशे वर्षांपूर्वी आपल्या साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी येथे हेतुपुरस्सर पसरवला, दृढमूल केला. आमचेही पुस्तकी पोपट बोलू लागले, 'खरंच, हा देश शेतीप्रधानच आहे.' म्हणजे आपला औद्योगिक वारसा विसरून आम्ही चिरकाल कच्चा माल निर्यात करून, पक्क्या मालाची वसाहत बनून निपचीत पडून रहावे हा परकीयांचा उद्देश आम्हीच सिद्धीस नेऊ लागलो.

आज इतिहासाची अशीच पुनरावृत्ती सुरू आहे. स्वतंत्र होऊन वीस वर्षे झाली तरी अजून आम्ही ' मागासलेले' आहोत हे ऊठसूट आम्हाला ऐकंवले जात आहे. हा शब्द फारच बोचत असेल तर घ्या, 'विकसनशील देश' हा जरा सभ्य किताब ! अर्थ एकच. स्वतःला विसरा, आपल्या नैसर्गिक साधनसामग्रीची आबाळ करा, परक्याला घरात हातपाय पसरू द्या. श्रीमंत राष्ट्रांच्या तयार मालाची कायमची बाजारपेठ बनून रहा. आयात जास्त, निर्यात कमी. तूट भरून काढण्यासाठी भीक; पण स्पर्धेसाठी मैदानात उतरू नका.हा विकसनशील देश असल्याने याला बराच काळ आधुनिक यंत्रतंत्रासाठी दुस-यावर अवलंबून रहावे लागणारच! यासाठी मदत घ्या, कर्ज मागा, काही सहयोग-सहकार्य वगैरे जमवा, वाटल्यास भीकही मिळेल. या आश्रितपणाची लाज-खंत कशासाठी ?

अशाने आमची गरिबी हटेल, मागालेपणाचा आमच्यावरचा डाग पुसला जाईल, अशी ज्या विद्वानांची समजूत असेल त्यांची असो बापडी. वास्तवात ही एक शुद्ध फसवणूक आहे. स्वतःची कदाचित् नसेल; पण देशाची निश्चित आहे.

गरिबी हटवण्याचा, पुढारलेले राष्ट्र म्हणून जगण्याचा राजमार्ग म्हणजे प्रयत्न आणि परिश्रम. स्वावलंबनाशिवाय गरिबाला दुसरा आधार नाही, हा एक अपरिवर्तनीय निसर्गनियम आहे. हे सत्य दृष्टीआड करून, परिश्रमांचा राजमार्ग सोडून गेली वीस वर्षे आपण कुठल्या मृगजळामागे भरकटत आहोत, याचा काही विवेक?

। ६९ ।