पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेऊन मंडळी आता गावोगाव प्रचाराला निघू लागली आहेत. सध्या फक्त सातपुडा भागातील आदिवासी समाजातच ही हालचाल उत्पन्न झाली आहे; पण लवकरच या विचाराला व्यापक कृतीचे रूप देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. परवाच म्हणजे ३० नोव्हेंबरला, धुळे येथे निवडक कार्यकर्त्यांची बैठक भरली होती. मीही होतोच. परिषदेची उद्दिष्टे, घटना, निधी, पुढील कार्यक्रम यासंबंधी बराच खल झाला.‘ग्रामस्वराज्य परिषद' ही मुख्यतः स्वावलंबी समाजनिर्मितीची चळवळ असल्याने तिचे कार्य व कक्षा फक्त आदिवासी भागापुरतीच मर्यादित असू नये, शक्यतो लवकर इतरही ग्रामीण व नागरी भागातही तिचा प्रसार होणे अगत्याचे आहे; दुर्लक्षिलेला, मागासलेला समाज फक्त सातपुडा भागातच नाही, शहरात-खेड्यांतही तो पसरलेला आहे ; एकतृतियांश लोकसंख्येला स्वातंत्र्याची फळे चाखावयाला मिळाली आहेत. भारतातील जवळजवळ दोनतृतियांश समाज हा अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षणाच्या बाबतीत वंचितच आहे--मग तो शहरातला असो, खेड्यातला असो वा डोंगरातला असो, हरिजन असो, गिरिजन असो, वा नागरजन असो; या सर्वांचा संयोग होऊन काही प्रबळ उत्थापन घडून आले तरच आदिवासींचेही प्रश्न सुटतील. एरवी वेगवेगळ्या प्रयत्नांनी, तुकड्या-तुकड्यांनी प्रश्न सुटणार नाहीत. आपल्याला सध्यातरी सरकारच्या दाराशी जायचे मुळीच कारण नाही. प्रथम हिंदुस्थानभर पसरलेल्या आपल्या भाऊबंदांना भेटू, त्यांची दुःखे ऐकू, आपली त्यांना सांगू आणि समान आशाआकांक्षांच्या बंधनांनी एकत्रित येऊन प्रगतीची पुढची पावले टाकू हा विचार उपस्थितांना बहुत मानवलेला दिसला.

धुळे बैठकीची ही माझ्या मते मुख्य फलश्रुती. आदिवासी समाज हा वेगळा समजून त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न हा दृष्टिकोन बदलून, तो व्यापक समाजपुरुषाचा अवयव या दृष्टीने त्याकडे पाहिले गेले व इतर अवयवांशी त्याचा संबंध जुळून, अवघ्या राष्ट्रीय उत्थानाचा येथे प्रथमच विचार झाला. धडगाव परिषदेत तीन ठराव जरी संमत केले, त्याच्या प्रचारासाठी मंडळी जरी बाहेर पडली तरी यांना आज, आत्ताचा मुख्य भेडसावणारा प्रश्न आहे अन्नधान्याच्या दुष्काळाचा; परंतु आम्ही सात वर्षे अर्धपोटी-उपाशी आहोत, यंदाही उपासमार चालू आहे, आम्हाला अन्न हवे एवढीच या बैठकीसाठी जमलेल्या मंडळींची पूर्वीप्रमाणे मागणी नव्हती. पाच-दहा किलो धान्य या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात नेले तर गोरगरिबाला पोलीस छळतात आणि शेकडो पोती या प्रांतातून त्या प्रांतात उघडपणे, बिनबोभाट जात-येत रहातात, हे कसे ? आज काश्मिरात चाळीस पैसे किलो दराने तांदूळ मिळतो आणि आमच्या भागात तीन रुपयांचा भाव का ? केरळात माणशी सहा-सहा किलो तांदूळ आणि मुंबईच्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीतही मूठभर तांदूळ का नाही ? बिहारात एकीकडे दुष्काळाचे थैमान चालू असताना, परक्या देशांतून

| ६७ |