म्हणजे स्वावलंबनाची हवा देशात सर्वत्र निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट आहे. सर्वानाच आज हे उद्दिष्ट मान्य आहे; पण कोणीही यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास पुढे येत नाही. मग ते पक्ष उजवे की डावे असोत, राज्यकर्ते वा विरोधी असोत. अन्नप्रश्नाच्या सोडवणुकीतून या स्वावलंबनाची सुरुवात व्हावी असे आपण मानले आणि त्या दृष्टीने शेतावर-शेतकऱ्यांकडे गेलो. प्रचलित कोंडी फोडण्यासाठी आपण हे क्षेत्र निवडले. त्यातही गेल्या वीस वर्षात सरकारी व सहकारी यंत्रणेच्या सहाय्याने गबर बनलेला मूठभर श्रीमंत बागायतदार शेतकरीवर्ग आपण वगळला व २-४ एकरात, जिराईत जमिनीवर नशीब घासणाऱ्या बहुसंख्य शेतकरी-मजूरवगांचा प्रतिनिधी आपण कामासाठी निवडला. याला कार्यप्रवृत्त करावे, अवश्य असणारी साधनसामग्री त्याला पुरवून अन्नोत्पादनवाढीला चालना द्यावी अशी आपली दृष्टी होती. यासाठी आपला प्रत्यक्ष संपर्क हवा म्हणून थोडा धोका, अधिक खर्च व त्रास सोसून ठेकेदाराऐवजी आपण स्वतःच काम अंगावर घेतले. यामुळे प्रथम सुप्याच्या आसपास, नंतर इतरत्रही स्वावलंबनाची एक हवा निर्माण व्हावी अशी आपली अपेक्षा होती. यात मात्र आपल्याला यश लाभले नाही. दुसऱ्या विहिरीचे काम केव्हा सुरू करता' असे आपल्याला प्रथम विचारले जाते याचा अर्थ काय ? वास्तविक, ' तुम्ही एवढे केले, आम्ही आता एवढे पुरे करतो, मग पुढचे ठरवू'–अशा स्वरूपाची काहीतरी भाषा हवी होती. म्हणजे आणखी हुरूप आला असता. एक अपवाद आहे आणि तो आपल्या तेथील कामामुळे घडला असे तुम्ही म्हणता हे ठीक आहे. सरकार इतकी वर्षे बांधावर लावण्यासाठी एरंडी मोफत वाटीत होते; पण सुपे भागात कोणीही बांधावर लावण्यासाठी एरंडी सरकारकडे मागितली नव्हती. यंदा आपल्या विहिरीच्या रस्त्यावरील शेतकऱ्यांनी हा उपक्रम केला. थोडाफार रस्ताही सुधारला; पण काही झाले तरी हा अपवादच. वर्षभरातील प्रयत्नातून यापेक्षा अधिक काहीतरी उगवायला हवे होते. आपले सातत्य कमी पडले हे तर खरेच; पण कामाच्या पद्धतीत थोडी सुधारणा करणेही अवश्य आहे असे वाटते.
हा सुधारणा अशी : एकीकडे आपले विहिरींचे ठराविक काम सुपे भागात चालू राहीलच; पण त्याचबरोबर लोकशिक्षणाचा एक स्वतंत्र व निराळा कार्यक्रमही आपल्याला हाती घेतला पाहिजे. प्रत्यक्ष विधायक कार्य व आंदोलनात्मक उठाव अशा दुहेरी कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय आपली कोंडी फुटणार नाही असे वाटते. त्या दृष्टीने मी शोधाशोध व हालचाल सुरूही केली आहे. गेल्या जुलैतच 'सातपुडा सर्वोदय मंडळा'चे काम पहाण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अक्राणी
ग्रा....५