Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंधी चार ठिकाणी बोलत रहाणे एवढेच तूर्त आपल्या हाती आहे. ते आपण करतोच आहोत.

पण एवढ्याने आपले समाधान होत नाही हे खरे. आपण अडखळलो आहोत दोन कारणांसाठी. एक : पहिली विहिर झाली, दुसरी झाली, तिसरी झाली आणि असेच पुढे तुटक काम करून वर्षा-दोन वर्षांनंतर आपण एक दिवस थांबलो-हे आपल्याला प्रशस्त वाटत नाही. आपल्याला बेरीज नको आहे, गुणाकार हवा आहे. जे काही आपले पैसे येथे खर्च होत आहेत ते भांडवल ठरावे, त्यातून सुप्याच्या दुष्काळी भागाच्या परिवर्तनाची काहीतरी कायम सोय होत रहावी, अशी आपली दृष्टी आहे. आपल्याला दानधर्म मुळीच अभिप्रेत नाही. विकास हवा. यासाठी कामाची घडी कशी बसवावी, आर्थिक व्यवहार कसे आखावेत हे अद्याप आपले ठरत नाही. ज्यामुळे तुमच्यासारख्या तेथे कामावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीचाही मेहनताना सुटावा, एका विहिरीमुळे वाढणाऱ्या उत्पन्नातील काही भाग नवीन विहिरी बांधण्याकडे वळविता येऊन बाहेरच्या पैशाची आवक ठराविक वेळेला थांबावी व आवक झालेली सर्व रक्कम आपल्यापेक्षाही अविकसित भागाकडे पुन्हा पाठविण्याची शक्यता व प्रवृत्ती वाढावी-एवढे सर्व आपल्याला घडायला हवे आहे. आपल्या कामाचे मोल गुणात्मक असले पाहिजे. नाहीतर सरकार हा सगळी कामे करीतच आहे. आपण कुठवर पुरे पडणार ? आपले निराळेपण योजकता ती काय दिसणार ? आपले श्रम व पैसा तेथेच अडकून रहाता कामा नये, तो सतत फिरला पाहिजे, वाढत राहिला पाहिजे, अशी काही व्यवहाराची मांडणी लवकर साधणे अगदी अवश्य आहे. दोन : हे झाले फक्त सुप्याबाबत; पण आपण अधिक व्यापक विचारही केला पाहिजे. 'माणूस प्रतिष्ठान' सुरू केले तेव्हा आपण कोणता हेतू मनाशी बाळगला होता ? आपल्याला काही शेतकरी व्हायचे नाही, विहिरींच्या कामाचे ठेकेदार व्हायचे नाही की, दानशूर व्यक्ती किंवा संस्था म्हणूनही नावलौकिक मिळवायचा नाही. १५ जुलै १९६६ च्या अंकात प्रवासाचे प्रस्थान ठेवताना लिहिले होते...

'माणूस' ची प्रकृती विधायक राजकीय-सांस्कृतिक आचारविचारांची आहे.

'आज अन्नस्वावलंनबनाची निकड आहे. निदान 'माणूस'ला असे वाटते की, आज या एका प्रश्नावर तरी मतभेद नसावेत. सर्व विरोध बाजूस सारले जावेत, सरकारी प्रयत्नांना पूरक ठरतील असे धान्योत्पादनवाढीचे उपक्रम व्यक्तीव्यक्तीने, गटा गटाने, पक्षोपपक्षाने आपल्या हिंमतीवर अंगावर घेऊन पूर्ण करावेत. स्वावलंबनाच स्वयंपूर्णतेचे देशव्यापी उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अशा छोटयाछोट्या, लहान-लहान स्वयंप्रेरित उपक्रमांचेही खूप सहाय्य होऊ शकेल. निदान एक वेगळी हवा निर्माण होईल.'

| ६४ |