पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महालात गेलो होतो. सात वर्षे हा गिरिजन भाग दुष्काळाच्या छायेत वावरतो आहे-त्याची ना दाद, ना फिर्याद.'सातपुडा सर्वोदय मंडळा'ने सरकारच्या तोडीस तोड असे काम तेथे उभे केले म्हणून आज काहीतरी जागृती तेथे दिसत आहे; पण याही जागृतीचे स्वरूप आपल्यासारखेच आढळते. लोक कोणाच्या तरी मदतीकडे सारखे डोळे लावून बसलेले. स्वतः उठायची प्रेरणाच नाहीशी झालेली.आपल्या सर्व योजनांमुळे, मदतकार्यामुळे ही परधार्जिणेपणाची, आत्मविस्मरणाची वृत्तीच सर्वत्र वाढीस लागणार असेल, तर मला नाही वाटत हा देशस्वतंत्र, स्वावलंबी व समर्थ राष्ट्र म्हणून केव्हाही जगात मानाने उभा राहिलेला दिसेल. जनतेचे डोळे सरकारकडे आणि सरकारचे श्रीमंत परदेशांकडे ! ही जर वीस वर्षांनंतर आपल्या विकासयोजनांची फलश्रुती असेल तर इथेच थांबून आपण सर्वांनी मुळापासून विचार करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. 'उपाशी, अर्धपोटी राहू, गरिबीत आणखी काही वर्षे काढू; पण परदेशी मदत घेणार नाही' हा निग्रह लोकांनी, लोकनेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी केला आणि त्या दिशेने आहे त्या साधन-सामग्रीतच देशउभारणीचे कार्य अंगीकारले तरच काही नवे तेज येथे दृष्टीस पडेल असे वाटते. सातपुड्याच्या जंगलातून, गावांतून हिंडत असता निदान मी तरी हाच विचार मांडीत होतो-'जंगलच्या राजांनो ! तुम्ही तरी भिकेची झोळी पसरू नका. स्वतःच्या पायावर उभे रहायला शिका. खरेखुरे राजे व्हा ; राज्य करा!'

आणि लागली मंडळी कामाला ! हात पसरण्याऐवजी सरकारशी देवाणघेवाणीची भाषा बोलण्याएवढे धैर्य त्यांच्यापाशी कुठून आले याचे मला आश्चर्यच वाटते. १५ ऑगस्टला जवळजवळ हजार-बाराशे माणूस अक्राणीविभागाचे मुख्य तालुका ठिकाण धडगाव येथे जमले होते. ग्रामस्वराज्य परिषद भरली. तीन मुख्य ठराव झाले. १ : सरकारने जंगले पूर्वीप्रमाणे गिरिजनांच्याच मालकीची केली तर कुठलीही मदत सरकारकडे मागू नये. २ : शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी गावागावाने उचलावी. ३ : या विभागावर आज शिक्षणासाठी जो सरकारी पैसा खर्च होत आहे तो रस्त्यांच्या कामासाठी सरकारने वापरावा. तीन तास या ठरावावर मोठी हमरीतुमरीची खुली चर्चा झडली. परिषदेला उपस्थित राहिलेले काही सरकारी अधिकारी चाट पडले की, अशा पावसाच्या दिवसात, तीस-तीस मैल चालून इतके लोक जमले कसे, एवढ्या समजुतदारपणाने वागले-बोलले कसे ? सात वर्षांची 'सातपुडा सर्वोदय मंडळा'ची व विशेषतः मंडळाचे अध्यक्ष श्री. दामोदरदासजी मुंदडा यांची तपश्चर्या, हेच या प्रश्नाचे खरे उत्तर. दुसरे काय ? आणि आता ही मंडळी स्वस्थ राहू इच्छित नाहीत. जंगले स्वाधीन करा, शिक्षणातून दूर व्हा आणि शिक्षणाचा खर्च रस्त्यांकडे वळवा, हा तीन ठरावांचा त्रिशूळ

| ६६ |