पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढे काय ?


संपादक ‘माणूस,' स. न. वि. वि.

गेल्या पंधरा ऑगस्टला माणूस प्रतिष्ठान' कार्याचा संकल्प आपण जाहीर केल्यापासून, किंबहुना त्याच्या आधीपासून, 'बाळ-बाळंतिणीची' सारी उन्नती घरातल्या माणसासारखी पहाण्याचे भाग्य मला लाभले. विशेषतः, हे सारे कोडकौतुक पुरवित असताना आपल्या कृतिनिष्ठेचे आणि अलिप्तपणाचेही कौतुक करणे अनावश्यक असले तरी याप्रसंगी अनुचित ठरणार नाही.

आमच्या गावात आपण हा सारा पसारा मांडीत असताना प्रथमप्रथम असणारी जनतेतील 'सरकारी काम' म्हणूनची उदासीनता आता ओसरली आहे. ही निराळीच भानगड, विशेषतः, आम्ही ग्रामीण मंडळी जिला 'खाज' म्हणतो ती, आता थोडीफार लोकांच्या डोक्यात शिरू लागली आहे. आता ते विचारतात, 'पुढे काय ?'

खरंच ‘पुढे काय' हा प्रश्न दोन शब्दात संपत असला तरी त्याला शाळकरा पोरांसारखे कागदावर उत्तर देऊन भागणार नाही. आमच्या भागातल्याच नव्हे तर भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांनी साऱ्या राष्ट्राचेच भवितव्य अंधारलेले असल्यामुळे येथून पुढे ही लावलेली दिवटी घेऊन अशीच वाटचाल करावी का ? यात आता काही सुधारणा करणे आवश्यक आहे ? 'माणूस प्रतिष्ठान'च्या या पद्धतीच्याच कार्याचा व्याप अधिक वाढवावा काय ? वाढवावयाचा झाल्यास हा परिसर निश्चित करावा काय ? या कामातील भलेबुरे अनुभव गाठीशी बांधून 'माणूस प्रतिष्ठान'ची उमेद खचणार नाही ना ? असल्या अनंत प्रश्नांचे कोंडाळे स्वत: भोवती निर्माण होत जाते. यातून मार्ग निघेल असा आत्मविश्वास मनात तर खूप आहे. वाटते ही सारी काळजी बाळ रांगते होईपर्यंतच करावयाची. पुढे कार्याची धुरा कोणीतरी उचलली पाहिजे. खरं तर हे आव्हानच आहे. त्यात पुन्हा ते तोंडपाटीलकीचे नाही. तुम्ही या प्रश्नावर काही विचार केला असल्यास कळावा म्हणून हा पत्राचा प्रपंच...

रतनलाल भंडारी, सुपे

| ६२ |