पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वारा जोराचा होता. थंडीचा कडाका एकदम वाढला होता. उघड्यावर निजण्याची बऱ्याच वर्षात संवय नव्हती. पांघरूण एकच होते.

खोपटाच्या मालकाने उशाशी ट्रान्झिस्टर आणून ठेवलाच होता. ' विविध भारती 'वर अमीरखाँ गात होते. मारव्याचा ऋषभ अशी काही आर्त कळ उठवून जात होता-कट्यारीचं टोकच जणू अंतराला झोंबत होतं, अंतर वर उचलीत होतं.

ज्या जगात दिवस इतके श्रमाचे आणि रात्री इतक्या आनंदाच्या असतील ते जग स्वर्गापेक्षाही सुंदरच आहे.

रात्र सरली होती. थंडी संपून गारवा जाणवत होता. तुरा असलेला एक कुर्रेबाज मित्र जवळ आला आणि त्याने तुतारी फुंकून जाग आणली. उजाडले होते.

*






[भूदानाचे जन्मठिकाण पोचमपल्ली. हैद्राबादजवळचे. या गावाकडच्या यात्रेतील पहिला दिवस. मार्च १९६७.]

| ६१ |