पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियोजनविषयक त्यांच्या खोल व्यासंगाचा माझ्या विचारांशी, अनुभवांशी ताळमेळ बघायचा होता. सारी सत्ता आणि मत्ता जर सरकारजवळ आहे तर पंचवार्षिक योजना अपेशी का ? जनतेचे पाठबळ नाही म्हणून सरकारने खंतावण्याचे कारण काय ? जनतेच्या पाठबळाशिवाय योजना यशस्वी होत नाहीत हे एकदा ध्यानात आल्यावर, हे पाठबळ मिळविण्याची काय सोय केलीत ? चीनमध्ये जनतेच्या आदरास व विश्वासास पात्र ठरलेला कम्युनिस्ट पक्ष होता म्हणून हा जनतेच्या पाठबळाचा प्रश्न तेथे सहज सुटला. रशियात सर्वच विकास सरकारने करण्याची पूर्वापारची परंपरा होती. तेथे भांडवलशाहीदेखील झारने आणलेली आहे. इंग्लंडअमेरिकेप्रमाणे काही धाडसी, कल्पक व कष्टाळू व्यक्तींच्या स्वयंप्रेरित धडपडीतून ती विकास पावलेली नाही. आपल्याकडे या देशांच्या लोकशाहीच्या कल्पना रुजवण्याचा एकीकडे प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे आर्थिक क्षेत्रात मात्र रशियाचे तंत्र उचलायचे, हे कसे जमणार ? इथे जनमानस विचारात न घेता केलेले नियोजन कसे यशस्वी होणार ?

हे सगळे मला बर्व्यांशी नीट बोलायचे होते. पण हा सुजन आता आपल्यात नाही, तेव्हा काय बोलणार ?

हा सुजन पुरंदऱ्यांच्या शिवचरित्राचा एक चहाता होता. 'It's a character building book' हे बर्वे यांच्या तोंडचे शब्द. घरोघर हा ग्रंथ जावा ही यांची तीव्र इच्छा. महाराष्ट्र शासनाने या ग्रंथाची स्वस्त आवृती काढावी यासाठी बर्वे यांनी खटपटही केली; पण यांचेच झाले थोडे आणि त्यात हे शिवचरित्राचे घोडे ! ते दिल्लीला गेले, इतर कुणालाच आस्था दिसली नाही, आम्हीही नसलेली आस्था निर्माण करण्याची पर्वा बाळगली नाही आणि अशा रीतीने शिवचरित्राच्या स्वस्त आवृती योजनेची इतिश्री झाली. पण छत्रपतींच्या पुण्याईवर, नावावर राज्य करणाऱ्या शासनात छत्रपतींच्या चरित्र-चारित्र्यप्रसारकार्यासाठी खटपट करणारा बर्वे हा एकच मंत्री निघावा, इतरांनी दरबारी देखावे करावेत, हा एक लक्षात राहिलेला अनुभव आहे.

हा सुजन मुंबईच्या निवडणुकीत मेनन यांचे विरूद्ध निवडून यावा असे आपल्याला जरूर वाटत होते. पण मेनन कम्युनिस्ट आहेत ही बर्वे यांची भूमिका 'माणूस'ला साफ नामंजूर होती. ज्या लोकशाही समाजवादाचे पाईक म्हणून बर्वे निवडणूक लढवीत होते तीच मेनन यांची विचारसरणी होती. फक्त मेनन यांची उपयुक्तता नेहरूंनंतर व एकदा काँग्रेसचा त्याग केल्यावर संपली आहे, असे आपल्याला वाटत होते. मेनन आता लिहित का नाहीत ? विशेषतः चिनी आक्रमणाबाबत, लंडनमधील भारतीय स्वातंत्र्यचळवळीबाबत, त्यांच्या सहवासात आलेल्या जागतिक कीर्तीच्या

| ५५ |