पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सहाय्य, सामग्री तत्परतेने पुरवावी. थोडेफार नियंत्रणही असावे. पण उभारणीची जबाबदारी समाजातल्या इतर सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक संस्थांवर टाकण्याचा प्रयोग जरूर करून पहावा. कोल्हापूरला कुठल्यातरी एका कॉलेजने विद्याथ्र्यांच्या मदतीने गेल्या काही वर्षांपासून नवीन जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयोग चालवला आहे, असे वर्तमानपत्रात वाचल्याचे आठवते. हा प्रयोग पहायचा, हेही ठरले. योग अद्याप आला नाही एवढेच. असे प्रयोग इतरत्र व्हायला काय हरकत आहे ? नाही तरी एन्. सी. सी. वर नऊशे कोटी रुपये खर्च केले आणि ते पाण्यात गेले असे होतेच. शिक्षणसंस्थांनी काळाची गरज ओळखून, फारशी सक्ती न करता जेवढे विद्यार्थी आपणहून तयार होतील त्यांच्या मदतीने, गावकऱ्यांना बरोबर घेऊन असे शेतीविकासाचे प्रयोग करण्यासारखे आहेत. सगळ्यांसाठी सुंदर अशी कोणतीच योजना नसते. पण सक्तीने चांगल्या योजनांचेही मातेरे होते असा अनुभव आहे. म्हणून शक्यतो भर स्वयंप्रेरणेवर हवा, गुणवत्तेवर हवा. काम लहान का मोठे रहाते हा प्रश्न गौण समजला जावा. शास्त्रशुद्ध, टिकाऊ आणि काम करणाऱ्याच्या शक्तीबुद्धीचा विकास साधणे, हे उद्दिष्टच हवे. भले चार गोष्टी कमी होतील; पण, होतील त्यांचा अभिमान बाळगता आला, त्यापासून इतरांना प्रेरणा लाभली तरी खूप साधले.

शिक्षणसंस्थांप्रमाणेच सामाजिक कार्याची हौस असणारे उद्योगपती-कारखानदारही प्रयोगक्षेत्रे उभारू शकतात ! एकमेकांची तुलना, स्पर्धा, देवाण-घेवाण होईल. जरा काही नवे रक्त या क्षेत्रात सळसळू लागेल. विकासाची सर्व जबाबदारी सरकारने स्वतःच्या एकट्याच्या शिरावर घेऊन, या योजनांद्वारे, समाजाच्या मानसिक सामर्थ्याची किती कोंडी करून टाकली आहे ! ज्यात समाज माझ्यासारखा असा लोळागोळा होऊन निपचित पडतो त्याला म्हणायचे मात्र समाजवादी नियोजन ! समाजवादी का सरकारी ? समाजवाद वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या मार्गानी, वेगवेगळ्या प्रकारांनी आणण्याची दृष्टी अधिक वास्तववादी ठरणार नाही काय ! आमच्या समाजवादाच्या कल्पना रशियन ठोकळयावरून बनलेल्या आहेत. हे ठोकळयांचे आकर्षण केव्हा संपणार ! आम्ही स्वतंत्र विचार, स्वतंत्र मार्ग केव्हा पत्करणार !

थोरामोठ्यांच्या विचारांवरही या परकीय आदर्शाचा पगडा ! 'माणूस प्रतिष्ठान'चा सूपे-प्रयोग सुरू झाला. स. गो. बर्वे यांचे तिकडे लक्ष गेले. मुंबईच्या निवडणुकीच्या धामधमीतही थोडा वेळ काढून यासंबंधी त्यांनी आस्थेने चौकशी केली, त्यामागील भावनेचा आदर केला. पण सल्ला असा दिला, की ' ही कामे करायला सरकार आहे, तुम्ही कशाला निष्कारण तुमची आधीच तुटपुंजी असलेली आर्थिक शक्ती या कामासाठी खर्च करता ?' मला त्यांच्याशी यासंबंधी सविस्तर चर्चा करायची होती.

| ५४ |