पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण या पुढच्या गोष्टी आहेत. तूर्त हाती घेतलेले विहिरीचे काम पूर्ण करणे, निदान पावसाळी विहिरीचे उद्दिष्ट गाठणे अवश्य आहे. पंचवीस फूट खोल विहीर खणून झालीच आहे. या पावसाळ्यात एवढ्या साठवणाने गरज भागते असे दिसून आले तर उत्तमच. साठा कमी पडतो असे वाटले तर पावसाळ्यानंतर पुन्हा काम सुरू करता येईल. कुठे थांबायचे यासाठी तज्ज्ञ आहेतच. शिवाय 'प्रतिष्ठान'चे या विहिरीसाठी ठरलेले बजेटही . !

आता प्रश्न आहे ‘माणूस प्रतिष्ठान'चा. या पावसाळ्याअखेरचा-येत्या चार महिन्यातला-कार्यक्रम काय ! सुप्याला काम नाही, मग जिकडे काम आहे, सुप्याच्या धर्तीचेच काम आहे, तिकडे 'माणूस प्रतिष्ठान' आपला मोर्चा का वळवीत नाही ? 'माणूस'च्या असंख्य वाचकांनी बिहारचा निर्देश केला आहे. 'माणूस प्रतिष्ठान' ने आपल्या शक्तीच्या प्रमाणात या तातडीच्या व निकडीच्या कार्यातील आपला वाटा उचलावा अशी आग्रहाची सूचना करणारी अनेक पत्रे गेल्या काही दिवसात 'माणूस' कडे येत होती. पण एकंदर बिहारसाठी लागणाऱ्या किमान निधीच्या मानाने सुप्याच्या विहिरीचा खर्च भागवून शिल्लक रहाणारा 'माणूस प्रतिष्ठान' चा निधी अगदीच किरकोळ आहे. वाचकांना व सर्वसामान्य जनतेला आवाहन करून 'माणूस प्रतिष्ठान'कडे देणगी वा मदतरूपाने नवा निधी गोळा करावा तर या सार्वजनिक पैशाचा किमान हिशेब वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी लागणारी कार्यालयीन यंत्रणा ‘माणूस' कडे नाही. अशा अवस्थेत हा निधी उभा करण्याची व बिहारसाठी त्याचा व्यय करण्याची अवघड जोखीम 'माणूस'ने स्वीकारावी की नाही, यावर कार्यालयात बरीच भवती न भवती सुरू होती. सर्वांच्या आधी, आपला खास प्रतिनिधी पाठवून 'माणूस'ने बिहारविषयीचे आपले वृत्तपत्रीय प्राथमिक कर्तव्य पार पाडलेले होतेऱ्याबद्दल कौतुकादराची शेकडो पत्रे वाचकांकडून आलेली होती. अधिक जबाबदारी उचलावी की नाही याबाबत मतभेद होते. मधूनच सुप्याच्या श्रमसप्ताहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून निरोपही येत होते, 'उन्हाळ्याच्या सुटीसाठी काय कार्यक्रम योजता आहात ! बिहार दुष्काळ निवारणासाठी काही काम करण्याची इच्छा आहे. परीक्षा संपल्याबरोबर येतो आहोत.'

पंचाईत होती ! युवकांची शक्ती संयोजित करणे किती अवघड असते याचा थोडा फार अनुभव श्रमसप्ताहात घेतलेला होता. त्यांच्या उसळत्या रक्ताला, साहसी वृत्तीला वाव राहील असा कार्यक्रम हवा. त्यांच्या स्वाभाविक चंचलतेने कार्यहानी होणार नाही याकडे पहावे लागते. वातावरण आनंदी हवे. शेवटपर्यंत सर्वांचा उत्साह टिकून राहिला पाहिजे. बिहार लांब आहे तोवर ठीक. तेथे गेल्यावर भाषेची अडचण जाणवेल, हवामान सोसवणार नाही, किमान स्वच्छता राखता,

| ५० |