पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येणार नाही, खाण्याचेच काय, पिण्याच्या पाण्याचेही हाल होतील ! ओरिसात ग्रामदान पुनिनर्माण कार्यासाठी देशातील विविध भागातून जमलेल्या शेकडो ध्येयवादी पदवीधर तरुण कार्यकत्र्याची मानसिक अवस्था मी जवळून पाहिली होती. केवढी उच्च स्वप्ने उराशी बाळगून ते तेथे आले होते. आणि महिनाभरातच तेथील गोंधळाला कंटाळून पार मरगळून गेले बिचारे ! तशीच अवस्था आपल्या विद्यार्थ्यांची होऊ नये ! कारण छायाचित्रे पाहून व वर्णने वाचून दुष्काळाचे एक भयानक भेसूर चित्र कल्पनेने रेखाटलेले असेल व विहारात गेल्यावर यांना उघड्या डोळ्यांना प्रथम वस्तुस्थिती दिसेल ती धान्याच्या काळ्या बाजाराची, राजकारण्यांच्या सत्तास्पर्धेची, सुशिक्षितांच्या उदासीनतेची, विद्याथ्र्यांच्या दंगलखोरीची, शहरातल्या चैनबाजीची. ' माणूस 'मधील वार्तापत्रे वाचल्यावर बिहारमध्ये 'पहाणी' करून आलेले एक नामवंत पत्रकार मला म्हणाले देखील, तुमच्या प्रतिनिधीने लिहिले आहे, तेवढा दुष्काळ मला काही कुठे दिसला नाही. बरोबरच आहे. सुखसोयी असणाऱ्या ठिकाणी आरामशीर वाहनातूनच त्यांनी प्रवास केला तर दुष्काळ त्यांना दिसणार कसा ? दोन्हीही चित्रे वास्तवतेला धरूनच आहेत. चैन, काळाबाजार, आळस, सत्तास्पर्धाही आहे आणि भूक-भूक-भूकही आहे. कार्यकर्ता केवळ भूकनिवारण कार्याला जातो, त्याला हे दुसरे काळे चित्र पाहून हादरा बसतो. कशासाठी आपण जीव धोक्यात घालून, हालअपेष्टा सोसत येथे राबायचे? असा त्याला प्रश्न पडतो आणि निराश होऊन, बधीर होऊन, संशयात्मा बनून तो परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. आपल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाची अशी परवड होऊ नये, त्यांच्या शक्तीचा असा अपव्यय, त्यांच्या भावनांचा असा अनादर आपल्याकडून होऊ नये, अशीही टोचणी होतीच.

पण महिन्याभराचा अवधी होता विचार करायला. पहिल्या आठवड्यात विद्यार्थी मोकळे होणार ! तोपर्यंत जरा भटकून तर येऊ ! ‘माणूस प्रतिष्ठान'च्या उद्दिष्टांशी सुसंगत व युवकांना प्रेरक असा एखादा कार्यक्रम योजता आला तर उत्तमच ! नाहीतर आपले ' अपरोक्ष' काम चालू आहे तेवढ्यावरच तूर्त समाधान !

अरे हो हो हो ! पण ही गाडी चालली आहे कुठे ? महानगराची सीमा कुठे, ‘माणूस प्रतिष्ठान' कुठे, बिहार कुठे, विद्यार्थी कुठे ? आता ही थांबलेली बरी. शिदोरीची वेळ झाली आहे. उजव्या हाताला शेतात, रस्त्याच्या कडेला विहीरही आहे. फक्त समोरून येणाच्या मुलाला विचारून घेऊ, या विहिरीचे पाणी पिण्यासाठी कसे आहे !

घर सोडल्यापासून उच्चारलेले पहिले शब्द ! साडेचार तासांचे मौन...पण यावेळी कोंडल्यासारखे मुळीच वाटले नाही...।

| ५१ |