पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न स्वीकारता, आपण जनतेच्या अवास्तव अनुरंजनालाच 'जागृती' समजून अपेक्षित यश त्यातून का निर्माण होत नाही म्हणून संभ्रमात पडतो. वास्तविक असंघटित व अप्रबुद्ध जनता केवळ आपल्या संख्येच्या जोरावर कोणतेही महत्कार्य सिद्धीस नेऊ शकत नाही असा इतिहासाचा अनुभव आहे. काही विशिष्ट ध्येयदृष्टीने भारलेल्या व्यक्ती वा संघटना, आपल्या अचल श्रद्धेच्या आणि असीम परिश्रमाच्या अग्नीने जेव्हा जनतेच्या शक्तिबुद्धी प्रदीप्त करतात तेव्हाच हा प्रचंंड समाजपुरुष जागा होतो व इतिहासात अजरामर ठरावे असे एखादे परिवर्तन घडून येते. प्रभू रामचंद्राचे दर्शन घडेपर्यंत तो महारुद्र हनुमान अरण्यातील इतर वानरगणांप्रमाणेच नाही का या झाडावरून त्या झाडावर उड्या मारण्यात आपले प्रचंड सामर्थ्य वेचीत होता? त्याच्या डोळ्यादेखत लंकाधिपती रावणाच्या राक्षससेना ऋषिमुनींच्या यज्ञवेदी उध्वस्त करीत होत्या; अनेक स्वर्गस्थ देवगण रावणाच्या बंदीखान्यात कोंडले गेले होते; अनेक आर्यस्त्रिया भ्रष्टविल्या जात होत्या. पण या साऱ्या अन्यायाची व अत्याचारांची जाणीवही या वानरगणांना नव्हती. ती निर्माण झाली प्रभु रामचंद्रांच्या दंडकारण्यप्रवेशामुळे; आणि मग शक्तिबुद्धी एकवटल्या; नीती आणि गती यांचा संगम झाला; सागरावर सेतू बांधले गेले; प्रचंड द्रोणागिरी हलले; अन्यायांचे परिमार्जन झाले; न्यायाची संस्थापना झाली; रामराज्याची गुढी उभारली गेली.

ज्याचा ध्येयवाद नव्या काळाची ग्वाही देतो, ज्याची संघटना त्यागी कार्यकर्त्यांच्या नैतिक बळावर उभी आहे, असा एखादा पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून तेथे लोकजागृतीचे कार्य करीत नाही, तोपर्यंत शासनविषयक सुधारणा कितीही केल्या तरी अपेक्षित असे लोककर्तृत्व येथे फुलणार नाही ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. आधुनिक काळात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात असे लोककर्तृत्व उपजले व तेथील अनुभवांवरूनच आपल्या योजनाकारांना जनतेच्या सहकार्याची निकड अधिक तीव्रतेने भासू लागली. परंतु तेथील कम्युनिस्ट पक्षाची जागा घेणारा एखादा पक्ष वा संघटना भारतात सिद्ध नसताना, आपणाकडे त्या प्रमाणात हा प्रयोग यशस्वी होईल ही अपेक्षा बाळगणे चूकच नाही का ? सत्ताधारी काँग्रेसपक्ष जनतेशी संपर्क ठेवून असला तरी ध्येयवादी, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची त्यात उणीव आहे. इतर पक्षांचा जनतेशी केवळ निवडणुकांपुरताच संबंध येतो. 'जनता' हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी. कोणी शेतकऱ्याला अस्मानात चढवितो तर कोणी कामगाराला अश्वारूढ करतो. परंतु सामाजिक जीवनाची पातळी उंचावणारे, जनतेला कर्तव्याची जाणीव देणारे, त्याग आणि साहसाला प्रवृत्त करणारे जबाबदार व विधायक नेतृत्वाचे आदर्श जनतेसमोर कोणीही उभे करीत नाही. अशा नेतृत्वाला प्रसंगी जनतेची नाराजी पत्करून कर्तव्याची शिकवण देण्याचे कार्य करावे लागते; परंतु हे नाराजी पत्करण्याचे कटु कर्म या लोकशाहीच्या राजकारणात सहसा

। ४१ ।