पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऐवजी केळीच्या उत्पादनाकडे वळले होते. त्यामुळे केळ्यांच्या वाहतुकीचा एक नवाच धंदा येथील लहान शेतकऱ्याला-तो कूळ असो की जमीनमालक असो - या काळात उपलब्ध झाला होता. दोन-तीन एकरवाला शेतकरीही आपली स्वतःची बैलजोडी व गाडी राखून होता. अर्थात फैजपूरच्या आसपासच्या यावल, भुसावळ, सावदा, रावेर या भागात केळ्यांची लागवड जमिनीच्या व हवापाण्याच्या अनुकूलतेमुळे जेवढ्या प्रचंड प्रमाणात होऊ शकली, त्या मानाने फैजपुरातील लागवड फारच थोडी होती. त्यामुळे ओघानेच येथील गरीब शेतकऱ्याची प्राप्ती मर्यादितच राहिली. बैलगाडीचे वरकड रोख उत्पन्न व सहा-आठ महिने पुरेल एवढे शेतचे धान्य एवढ्या पुंजीवर येथील शेतकरी आपली गुजराण बऱ्यापैकी करू शकत होता, एवढाच या कालावधीचा फैजपूरपुरता तरी अर्थ आहे.

स्वातंत्र्योत्तर काळ

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही स्थिती पालटली. या तिसऱ्या कालखंडात दोन प्रमुख घटनांनी फैजपुरातील शेतकरीजीवनावर परिणाम घडवले. एक म्हणजे वाहतुकासाठी ट्रक्स वापरात येऊ लागले. रस्त्यावरून केळ्यांच्या घडांनी भरलेले ट्रक धावू लागले तशा बैलगाड्या मागे पडत गेल्या व तेथील लहान शेतमालकाला किंवा कुळाला मिळणारे वरकड रोख उत्पन्न बुडाले. या बुडालेल्या वरकड उत्पन्नाची भरपाई नंतर कशानेही होऊ शकली नाही. हे एक नुकसान आणि यापुढे लहान शेतकऱ्याला बैलजोडी ठेवणे परवडू शकणारे नसल्याने शेतकामाच्या व्यवस्थेत अडचणी उत्पन्न होणार होत्या, हे दुसरे नुकसान. या दोन आघातांमुळे येथील शेतकरीवर्ग बसत चालला असतानाच स्वातंत्र्यकाळातील कूळकायदा अस्तित्वात आला आणि त्यामुळे येथील शेतीची पूर्वव्यवस्था आणि पूर्वसंबंध यात फारच मूलगामी बदल घडून आले.

कायद्याचे पुरोगामित्व

कायद्याचे मोठेपण त्यात कोणती सामाजिक न्यायाची किंवा तात्त्विक श्रेष्ठतेची तत्त्वे ग्रथित झालेली आहेत यावरूनच केवळ ठरवावयाचे नसते. ही तत्त्वे प्रतिपादन करण्याचे किंवा त्यासाठी प्राणपणाने झगडण्याचे कार्य समाजातील द्रष्टे पुरुष करीतच असतात. या द्रष्ट्यांची स्वप्ने साकार करण्याचे कार्य तेवढे राजसत्ता व तिचे प्रमुख हत्यार जे कायदे त्यांनी साधावयाचे असते. हे व्यावहारिक यश जर कायदे करून पदरात पडत नसेल, तर केवळ एखाद्या कायद्यात उच्च तत्त्वांचा उदघोष केला आहे एवढयावरून तो कायदा समर्थनीय ठरत नाही. कुळकायद्याला हाच सर्वसाधारण नियम प्रथम लावला पाहिजे. 'कसेल त्याची जमीन' हे तत्त्व

। २४ ।