पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिस्थितीचे तीन कालखंड

फैजपूरच्या तेरा हजार लोकवस्तीतील जवळजवळ दोनतृतीयांश वस्ती शेतकरी समाजाची आहे. या शेतकरी समाजातही २०-२५ एकर जमीन धारण करणारे मोठे जमीनमालक शेकडा एक या प्रमाणातही नाहीत. जवळजवळ सर्व शेतकरी समाज २-४ एकर जमिनीचा मालक, कूळ किंवा शेतमजूर या सदरात मोडेल असा आहे. या सर्वसामान्य शेतकरीवर्गाच्या परिस्थितीचे गेल्या ३०-४० वर्षांत एकूण तीन कालखंड पडतात. पहिला कालखंड १९३६ पूर्वीचा. काँग्रेस अधिवेशनापूर्वीचा हा काळ. फैजपूर तेव्हा समृद्ध होते. खानदेशच्या या भागात कापसाची लागवड भरपूर प्रमाणात त्यावेळी होत असे. फैजपूर हे या भागातील, यावलभुसावळ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे कापसाच्या खरेदी-विक्रीचा व्यापार मोठ्या प्रमाणात त्यावेळी चालू असे. खुद्द फैजपुरात त्यावेळी ७ जिनिंग व ४ प्रेसिंग असे एकूण ११ कापूस कारखाने होते व कारखान्यात सुमारे हजारअकराशे माणूस कामाला राहू शकत होते. व्यापार आणि लहान कारखानदारी यामुळे निर्माण झालेल्या सुबत्तेत शेतकरीवर्गही आपापल्या कुवतीप्रमाणे सामील झालेला होता. आजच्या परिभाषेत बोलायचे म्हणजे शेतमालक, शेतमजूर किंवा कूळ या तिघांनाही ही परिस्थिती आपापल्यापरीने अनुकूल होती. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्वांना बारा महिने पुरेल असा भरपूर उद्योग या काळात उपलब्ध होता. फैजपुरात ज्या काही सुधारणा आज दिसत आहेत त्या या ३६ पूर्वीच्या कालखंडातच पार पडलेल्या आहेत. येथे शाळा स्थापन झाली १९१७ मध्ये. गावचा मुख्य रस्ता तयार झाला पहिल्या महायुद्धाच्या आसपास. त्यावेळी गावचे क्षेत्र होते सव्वा चौरस मैल. आज तीस-चाळीस वर्षांत या क्षेत्रफळात एका फुटाचीही वाढ झालेली नाही. गावातील सडकांची आजची लांबी सुमारे चार मैल आहे. यापैकी बहुतेक सर्व रस्ते जुन्या काळी तयार झालेले आहेत.

गावातील देवस्थानांच्या संख्येत वाढ नाही. प्राथमिक शाळेच्या उभारणीत सुधारणा नाहीत. जे स्वरूप त्या सुबत्तेच्या काळात फैजपुरने एकदा धारण केले ते आज तीस-चाळीस वर्षानंतरही तसेच कायम आहे.

योगायोगाने काँग्रेस अधिवेशनाच्या आसपासच फैजपूर जागतिक शेतीमंदीच्या लाटेत सापडले आणि फैजपुरातील कापूसकारखाने व कापसाच्या बाजारपेठा हळूहळू बंद पडत गेल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला म्हणजे १९३९ च्या सुमारास यापैकी फैजपुरात काहीही शिल्लक राहिले नव्हते. परंतु येथील निवडक शेतकरी कापसा-

। २३ ।