Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन आज तेरा वर्षाचा कालावधी लोटला. मिळालेले स्वातंत्र्य बळकट करण्यासाठी; जनतेचे दारिद्रय व अज्ञान नष्ट करण्यासाठी; आपल्या औद्योगिक व सामाजिक विकासाचा वेग वाढविण्यासाठी या तेरा वर्षांच्या कालावधीत दोन पंचवार्षिक योजना पूर्ण करण्यात आल्या आणि तिसरी अकरा हजार कोटींची महत्त्वाकांक्षी योजना अंमलबजावणीसाठी जवळ जवळ सिद्ध झालेली आहे. परंतु ज्या जनतेसाठी या योजनां मुळात अस्तित्वात आल्या ती जनताच या योजनांच्या कार्यवाहीशी अपेक्षित प्रमाणात सहकार्य देत नाही असा आजवरचा अनुभव आहे. अनेक सरकारी व निमसरकारी तज्ज्ञ समित्यांनी केलेल्या पहाणीतून ही गोष्ट निदर्शनास येऊन चुकलेली आहे की, योजनांना जनतेचे सहकार्य न मिळाल्याने त्यांच्या यशस्वितेतही मोठ्या उणीवा राहून गेल्या आहेत. या उणीवांकडे आपण दुर्लक्ष केले आणि जनतेचे औदासिन्य गृहीतच धरले, तर आपले स्वातंत्र्य बळकट करण्याचा आपला मूळचा संकल्प सिद्धीस जाणार कसा !

लोकांच्या या औदासिन्याचा सर्वांनीच सहानुभूतीने शोध घेतला पाहिजे. कारण हे औदासिन्य दूर होऊन बहुसंख्य जनता कार्यप्रवण होणे, व वेगाने तिने आपल्या विकासासाठी निर्माण झालेल्या सर्व योजनांशी सहकार्य करण्यास तयार होणे हीच आमच्या स्वातंत्र्यरक्षणाची व संवर्धनाची एकमेव हमी आहे. असे सहकार्य करण्यास ही आमची जनता आज का उत्सुक नाही हे जाणून घेण्यासाठीच, एका लहानशा गावाची ही वाटचाल आपण जवळून पहात आहोत. येथे जे दिसेल ते स्वीकारण्याची आपली सर्वांचीच तयारी आहे, कारण उणीवा दूर करून पुढे जाण्यासाठी आपण काळाशी बांधलेले आहोत.

या गावाचे नाव आहे फैजपूर. आपला स्वातंत्र्याचा लढा खेड्यापाडयापर्यंत पोहोचावा या उद्देशाने येथे बरोबर पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. १९३६ साली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामुळे या गावाचे नाव त्याकाळी महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या भारतातही सर्वतोमुखी झाले होते. डिसेंबर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार बाळासाहेब देसाई खानदेशातील या भागात दौऱ्यावर आले असता फैजपूरचा उल्लेख ‘आमचे पंढरपूर' या शब्दात त्यांनी केला होता. यावरून अद्यापही ऐतिहासिकदृष्ट्या या गावाचे महात्म्य किती आहे याची सहज कल्पना येते. या पंढरपुरातच स्वातंत्र्याचा प्रकाश किती दूरवर व खालवर फैलावला आहे, गेल्या तेरा वर्षांतील आमचे विकासकार्य येथील बहुसंख्य जनतेपर्यंत किती प्रमाणात पोहोचले आहे, हे पाहणे सर्व दृष्टीनेच मोठे उद्बोधक ठरेल. कारण विकासकार्याचे प्रत्यक्ष लाभ आमच्या बहुजनसमाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत पोहोचण्यावर जनतेचे सहकार्य व जागृती या गोष्टी अवलंबून आहेत.

। २२ ।