पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका गावची
स्वतांत्र्यकालातील वाटचाल...


‘ही ध्येये आमच्यासमोर असली तरी डोळ्यांसमोर दिसणारी परिस्थिती आणि हरघडी येणाऱ्या अडचणी ह्यांना डावलून चालावयाचे नाही. लक्षावधी लोकांची उपासमार आणि बेकारी असे या परिस्थितीचे वर्णन करता येईल. तिच्या तावडीत मध्यमवर्गसुद्धा सापडलेला आहे. ही भीषण परिस्थिती वणव्यासारखी फैलावत चाललेली दिसते. अनेक दुःखदायक विरोधांनी हे जग भरलेले आहे. पण हिंदुस्थानात आश्चर्यमूढ करून सोडणारे जे विरोध आढळतात तसे इतरत्र सापडणार नाहीत. साम्राज्यशाही सत्तेच्या व्यक्त चिन्हाप्रमाणे हीन प्रवृत्तीच्या द्योतक अशा कलेने नटलेली नवी दिल्ली पहा ! तिच्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. पण तेथून चार-दोन मैलांच्या आत हिंदुस्थानातील उपाशी शेतकऱ्यांच्या चंद्रमोळी झोपड्या उभ्या असलेल्या दिसतील. त्यांच्याच चार-सहा आण्याच्या मिळकतीतून हे महाल उभारले जातात आणि गलेलठ्ठ पगार दिले जातात........!'

पंडितजी, १९३६ साली फैजपूरला काँग्रेस अधिवेशन भरले असता आपण अध्यक्षपदाच्या आपल्या भाषणातून वरील विचार व्यक्त केलेले आहेत.

त्या अधिवेशनाला ठीक पंचवीस वर्षे लोटली. त्यातील चौदा वर्षे आपण नवभारताचे भाग्यविधाते पंतप्रधान आहात.

त्या फैजपूर गावातच या प्रदीर्घ कालावधीत आपल्याला प्रिय असणारी ध्येये किती प्रमाणात साध्य झाली हे पहाण्यासाठी ही नम्र वाटचाल अंगीकारली आहे.

आपला ध्येयवाद यशस्वी होण्यासाठी आम्ही काय करणे' अवश्य आहे त्याचा शोध घेणे हाच या वाटचालीमागील हेतू आहे.......

। २१ ।