पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण आपल्या बहुमोल शक्ती या एका क्षेत्रातच वेचल्या असल्या तर केवढे भरीव कार्य आपल्यामागे उभे राहिले असते ? कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांचे आदर्श आपल्यासारखा हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्याने नजरेसमोर ठेवायचे याचा अर्थ नेमका हाच आहे. राजकारणी माणूस उथळ कामात रस घेणारा असतो. सामाजिक कार्यकर्त्याने 'सखोल कार्य' हेच आपल्या सर्व हालचालींचे मुख्य सूत्र ठेवले पाहिजे. आज सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात स्थान नाही, राजकारण्यांच्या हातातील खेळणी म्हणून बहुतेक ठिकाणी त्यांचा वापर होतो याचे कारण काय ? मला वाटते आपण सखोल कार्याचे आपले आदर्श विसरलो म्हणून ही पाळी आपल्यावर आली. आपले समाजातील नेमके स्थान आपण सोडले म्हणून मानही गमावून बसलो. पहा पटतो का हा विचार आपल्याला !

पत्र फारच लांबले. जरा मोकळेपणाने लिहिले. राग नाही ना आला ?

कळावे.
आपला
श्री. ग. मा.


परिशिष्ट दोन

प्राथमिक शाळेच्या इमारतीत माझी व एकनाथ भोसले यांची मुलाखत चालू होती. सुविद्य घरंदाजाला लाजवील इतक्या सभ्य शालीनतेने एकनाथराव मी विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरे हळू आवाजात देत होते. मिशीला ताव देऊन बोलावे असे केवढे प्रचंड कार्य या अबोल माणसाने नागझरी गावात करून ठेवले आहे ? परंतु आत्मप्रौढीचा लवलेश नाही. मुलाखत संपायच्या वेळी मी विचारले ‘एकनाथराव! आपला फोटो हवा आहे. तो मासिकात मला छापायचा आहे.' गोड शब्दात एकनाथराव उत्तरले, ' द्यायला हरकत नाही ; पण माझा एकट्याचा फोटो छापून आला तर गावाला काय वाटेल ? मी एकट्यानेच मोठेपणा घेतला असे होईल. वास्तविक सगळ्या गावानेच कामे केलेली आहेत.' मी अवाक् झालो. एकनाथरावांचे म्हणणे अगदी अचूक होते! सामुदायिक नेतृत्वाची कला या माणसा-

। १८ ।