पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जवळ आहे याची साक्षच पटली. दिल्लीतल्या थोर नेत्यांना जे जमत नाही ते या नागझरीतल्या एकनाथला सहज जमून गेले.

नागझरी कोरेगाव तालुक्यात येते. भोसले घराण्यातील मंडळींचा भरणाच गावात विशेष. लोकसंख्या आहे दीड हजार. दहा वर्षांपूर्वी गावात बैलगाडी काही सरळ येऊ शकत नव्हती, इतके गाव आडवळणाचे व डोंगराळ मुलखातले. पण ज्यांची पैशात किंमत एक लाख रुपयापर्यंत जाईल इतकी श्रमदाने गावकऱ्यांनी एकनाथरावांच्या मार्गदर्शनाखाली अद्यापपर्यंत पार पाडलेली आहेत. या श्रमदान कार्याचा तपशील असा :

श्रमदानाची किंमत रु.   कार्य
९,०००      शाळा
७,५००      तालीम
९,०००      समाजमंदिर
१७,५००      दोन पूल
२२,०००      आर्वी-पुसेसावळी ६ मैल रस्ता
९,५००      रस्ते
९,०००      रोड डेम्स.
__________
१,०३,५००

ही कामे वर्गण्या जमवून केलेली नाहीत. खुद्द एकनाथराव ८-८ तास गावकऱ्यांबरोबर कुदळ-खोरे घेऊन प्रत्यक्ष कामाला लागले होते. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्याही स्वखुशीने देणग्या म्हणून. त्यांचा सरकारी साराही अद्याप मालकच भरतात. गाव शिक्षण मोहिमेत सर्व गाव साक्षर झाले. निर्मलाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामगौरव समारंभही साजरा झाला. गावात वाचनालय आहे. दुसऱ्या कसोटीला बसण्याची गावकऱ्यांची तयारी आहे.

एकनाथरावांनी आता एका नवीन जबाबदारी शिरावर घेतली आहे. गावात सहकारी शेती यशस्वी करून दाखविण्याचा त्यांचा मानस आहे. २६ गावकऱ्यांची १२० एकर जमीन एकत्र करून एक जॉईंट फामिंग सोसायटी त्यांनी नुकतीच रजिस्टर केलेली आहे. जमीन सामान्य दर्जाच्याच आहेत. सर्व शेतकरी २-४ एकरवालेच आहेत.

। १९ ।