पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विविध विकास प्रकल्पामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या गुंतागुंतीच्या बाजूचा विचार करावा लागणार आहे. ग्रामायनांची नुसती ‘बेटे' राहू नयेत, आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सागरी लाटांनी ती बेटे बुडून जाऊ नयेत, यासाठी एका व्यापक यंत्र-तंत्र-प्रधान व्यवस्थेशी ती आपल्याला जोडून घ्यावी लागणारच. या संदर्भात माझे हे प्रश्न आहेत. मात्र ते शंकेच्या स्वरुपाचे आहेत. कारण माझ्याजवळही त्यांची पूर्ण आणि समाधानकारक उत्तरे आहेत असे नाही. माजगावकरांना या प्रश्नांचा आणखी सर्वांगीण विचार करावा लागेल म्हणून या प्रश्नांचे प्रयोजन.

 या पुढचा समाज सर्वार्थाने आणि संपूर्णपणे उद्योग-तंत्र-प्रधान रहाणार आणि त्या समाजातील मध्यवर्ती शक्ती यंत्र-तंत्र रहाणार, या अटळवादाला किंवा निश्चितीवादाला चीनने आपल्या आर्थिक धोरणाने आणि कम्यून्सची उभारणी करून रोखले आहे, असे अलीकडे बऱ्याच आणि निरनिराळ्या देशांतील निरीक्षक विचारवंतांनी म्हटले आहे. चीनची कम्यून्स आहेत किती, त्यांचे प्रमाण किती, त्यांचे सातत्य किती, पाश्चात्यांची यंत्र-तंत्रे झुगारुन त्यांनी आणलेली मध्यम पातळीची यंत्र-तंत्रव्यवस्था (Intermediate Technology) कितीशी निर्णायक स्थिर आणि सापेक्षतः कायम रहाणार आहे, या प्रकरणात सोव्हिएट रशियाविरुद्ध असलेल्या तात्त्विक संघर्षांविरुद्ध चिनी साम्यवादाचे वैशिष्ट्य म्हणून प्रचाराचा गदारोळ किती, ही सगळी अजून मोठीच प्रश्नचिन्हे आहेत. त्यांच्या गराड्यात न सापडता एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की, माओच्या चीनमधील कम्यून्स आणि गांधी-विनोबाप्रणीत आणि त्यांच्यापासून फुटून पण त्यांच्या मूलभूत प्रेरणेने संकल्पिलेल्या ग्रामसुधारणांच्या योजना, यांच्यामध्ये काहीएक साम्य आहे, या विचाराने आणि त्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक ध्येयवादाच्या आशयाने, माजगावकरांसकट आपण सारे प्रभावित झालो आहोत. या दोन व्यवस्थांमध्ये कोठले तरी एक जवळिकीचे सांस्कृतिक नाते आहे, एक प्रकारचे खास पूर्वेकडचे समान रंग आहेत, अशीही एक भावना आपल्याकडे निर्माण झाली आहे. हे नाते आणि या भावना निर्माण होण्याइतके साम्य या दोन प्रयोगात आहे - यात संशय नाही. ( उदा. शहरी संस्कृतीतील हावया उपभोगप्रधान संस्कृतीविरुद्ध प्रतिक्रिया, छोट्या कुटीरोद्योगांची आवश्यकता, काही उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करून त्यांची लहान गावातून करावयाची संघटना, गरीब जनतेच्या गरिबीशी सहभागी होण्याची प्रेरणा, शारीरिक श्रम-मूल्यांची प्रतिष्ठा, संस्थांइतकाच माणूस बदलण्यासाठी मूल्यांच्या आवश्यकतेवर भर इ. इ.); पण त्याचबरोबर त्यात काही महत्त्वाचे विरोधही आहेत इकडेही आपले लक्ष गेले पाहिजे.

 १. चीनमधील कम्यून्स ही पूर्णपणे पक्ष-नियंत्रित आहेत. माजगावकरांना हव्या असलेल्या लोकसंघटना' कडून ती बांधली गेलेली नाहीत. कम्यून्समागे केवळ

। १९० ।