पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/196

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रचंड व्यापारीकरण करून शेतमालासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे जाळ निर्माण करावे लागेल. या सर्व कारणांमुळे 'शेतीप्रधान समाज' - (भारत आणि आशिया इ. देशांतील समाजाचे रूप हे असे मानले जाते) - या शब्दांना केवळ एक मर्यादित आणि संक्रमणावस्थेपुरताच अर्थ राहील. विराट लोकसंख्या अन् विराट दारिद्रयाच्या भारतासारख्या देशांना उद्योग आणि तंत्रप्रधान समाजाचा हाच नमुना स्वीकारावा लागेल.

 यंत्र-तंत्रज्ञानाबद्दलचा हा जो अटळवाद किंवा निश्चितीवाद (Determinism) आहे तो आपल्या विसाव्या शतकातील यक्षप्रश्नच आहे. आशियातील अजूनही बऱ्याचशा प्रमाणात उद्योगपूर्व–अवस्थेत असलेल्या भारतासारख्या देशांचे आर्थिक आणि सांस्कृतिक भवितव्यही याच प्रश्नाशी निगडित असल्यामुळे या एका प्रश्नाचा पाठपुरावा भारतातील विचारवंतांना एकसारखा करावा लागणार आहे. या प्रश्नाच्या संदर्भात, वर सूचित केल्याप्रमाणे काही वेळा माजगावकरांच्या मनात उद्योगपूर्व समाजाचे चित्र रेंगाळत आहे असे जाणवते, तर काही वेळा हे चित्र रोखठोकपणे नावारून ते म्हणतातः ‘औद्योगिक संस्कृतीपुढे पराभूत ठरलेल्या जुन्या ग्राम व्यवस्थेच्या पुनरूज्जीवनाचा दुबळा प्रयत्न, हे आजच्या गांधी-विनोबाप्रणीत ग्राम ज्या विचारांचे स्वरूप आहे, हे बदलले पाहिजे. भांडवलशाही व समाजवादी संस्कृतींच्या यशापयशाचा संदर्भ या विचारांना जोडला पाहिजे. यंत्रयुगाला भिऊन पळायचेही नाही, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचेही नाही. या युगावर स्वार व्हायचे आहे. असा आधुनिक आणि लढाऊ दष्टिकोन असेल तरच नक्षलवादालामाओवादाला ग्रामदान-ग्रामस्वराज्यवाद पर्याय ठरू शकेल.' ( ग्रामायन पृष्ठ १३६ )

 यावर माझी तक्रार एवढीच आहे की, हे सर्व स्थूल आहे. ते वाचून काही प्रश्न अनुत्तरित रहातातच. उदा. ग्रामस्वराज्य आणि शहरे, शहरी जीवनपद्धती, शहरी समाजरचना यांचे संबंध काय असतील ? चीनमधील कम्यून्स शहरविरोधी आहेत. इस्राइलमधील ' किबुत्झ ' शहराशी दुवा सांधून, शहरी प्रवाहाशी समरसलेली आहेत. आपली दृष्टी काय रहाणार आहे ? चीनमधील कम्यून्स ही स्थानिक तळोवर वरवर स्वायत्त असली तरी चीनमधील आर्थिक नियोजन हे केंद्रवर्ती (Centrally directed) आहे. पैसा,यंत्र-तंत्रे. कर्ज इत्यादी साधनसामग्रीवरही(Resources) केंद्र्सत्तेचे नियंत्रण आहे. ग्रामस्वराज्यातील आर्थिक नियोजनाची कोणती पातळी आपल्याला अभिप्रेत आहे? स्थानिक ? प्रादेशिक ? केंद्रवर्ती ? केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांचे आणि ग्रामस्वराज्याचे ग्रामघटक, यामधील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञान आणि यंत्रणा कोणत्या पद्धतीची असेल ? हैं काही प्रश्न मी इथ मांडतो आहे ते अशासाठीं की, ग्रामसुधारणां' च्या

। १८९ ।