पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्वारकाही जेथे बुडली तेथे आपला मुंबई-कलकत्ता संस्कृतीचा उसना बडिवार किती काळ टिकणार ! कितीही वैभवशाली, दैदीप्यमान, पुढारलेल्या वगैरे असल्या तरी केवळ शहरी संस्कृतींचा समूळ विनाश हा अटळ असतो. ग्रामीण आणि नागर ह्या दोन संस्कृतींचा समन्वय, एक विशिष्ट तोल ज्या समाजांनी साधला तेच समाज टिकले; पराभवाच्या राखेतूनही पुनःपुनः वर उठले. बाकीचे इतिहासजमा झाले.'

 ( आजवरच्या वेगवेगळ्या संस्कृतींचा विनाश आणि पुनरुत्थान केवळ शहरी विरुद्ध ग्रामीण संस्कृतीचा तोल किवा बेतोल या प्रक्रियांमुळे सांगता येईल असे मला वाटत नाही. खरे म्हणजे कोणत्याच प्राचीन संस्कृतीला शहरी-ग्रामीण तोल सांभाळता आलेला नाही. जेत्या आणि पराभूत समाजाची शहरे आणि खेडी या दोन्हीही क्षेत्रांत अर्थरचना आणि समाजरचना विषमच होती आणि सर्वच प्राचीन संस्कृतींचा पाया विषमच होता; पण संस्कृतींच्या इतिहासाच्या मीमांसेचा हा प्रश्न, या ठिकाणी इतका महत्त्वाचा नाही. )

 उद्योगपूर्व आणि आधुनिक उद्योग-प्रधान समाज व संस्कृती यांच्या तुलनात्मक स्वरूपाचा विचार करताना अपरिहार्यपणे आपल्याला यंत्र-तंत्रज्ञानाच्या (Technology) जागतिक संदर्भाचा आणि स्वरूपाचा विचार करावा लागतो. याबाबत आमच्या समाजशास्त्रातील काही प्रमुख विचारवंताचे म्हणणे असे आहे.

 तंत्रज्ञान (Technology) ही एक जागतिक शक्ती आहे आणि या तंत्रज्ञानामुळे जगातील सर्वच समाजांच्या संस्कृति रचनेच्या प्रक्रियांवरच एक निर्णायक आघात केला आहे. हा आघात इतक्या मूलभूत स्वरूपाचा आहे की, मानवी जीवनात त्यामुळे झालेले स्थित्यंतर हे अपूर्व आहे. उद्योगपूर्व समाजांचे पूर्वीचे नमुनेच त्यामुळे गैरलागू ठरत जाणार आहेत. नागरी आणि ग्रामीण अशा दोन वेगळ्या समाजांच्या व संस्कृतींच्या भाषेत आता बोलता येणार नाही. आर्थिक उत्पादनाचे सतत वाढते प्रमाण व वेग, त्यासाठी यंत्रशक्तीचे व मोठ्या उद्योगधंद्याचे अधिष्ठान, त्यासाठी बांधावी लागणारी यंत्र-तंत्रसन्मुख अशी एकमुखी शिक्षणपद्धती, यातून निर्माण होणारे औद्योगीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानावर आधारलेली व्यवसायपद्धती, अशी ही साखळी आहे. ही साखळी अन् त्यातील दुवे हे निदान अमेरिका, रशिया, भारत, चीन यासारख्या मोठ्या आकाराच्या देशांपुरती तरी अटळ आहे. औद्योगीकरणाचा व तंत्रज्ञानाचा हा एकंदर व्यूहच असा आहे की, त्यामध्ये खेडेगावे ही पूर्वीच्या किंवा कोणत्याच अर्थाने खेडेगावे रहाणार नाहीत. म्हणजे ती स्वयंपूर्ण, स्वायत्त ठेवता येणार नाहीत. शेती हीसुद्धा पूर्वीच्या अर्थाने, गुराढोरांच्या श्रमावर व मजूरशक्तीवर आधारलेली रहाणार नाही. शेती हा सुद्धा एक प्रचंड उद्योगधंदा ( Industry & Commerce) म्हणून आपल्याला बघावा लागेल. आधुनिकातील आधुनिक अशा यंत्र-तंत्रज्ञानाने कार्यक्षम करून आणि तिचे

। १८८ ।