पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थापन करण्याची कल्पना निघाली. कल्पना अगदी स्तुत्य. कारण ल्हासुर्ण्यात सर्व कार्य अशा गावसमित्यांनीच घडवून आणले होते. पण गावात शिक्षणाची लाट उसळल्यानंतर तिला योग्य वळण लावण्यासाठी गावाने आपणहून समित्या स्थापन करणे वेगळे आणि तलाठी मामलेदार यांनी घाईघाईने गावाला भेट देऊन सरपंच-पुढारी पाटील यांची एक नाममात्र समिती स्थापन करून त्यांच्यावर समाजशिक्षणकार्याची जबाबदारी टाकणे वेगळे. ल्हासुर्ण्याचा सांगाडा उचलला; त्यातले चैतन्य मात्र सांडून गेले.

स्त्री जागी झाली पाहिजे

अशा प्रकारे स्थापन झालेल्या समित्या कोणतेच कार्य करू शकणार नाहीत हे उघड आहे. विशेषतः सरपंच, पाटील, पुढारी ही मिरासदार मंडळी समित्यांवर असली म्हणजे त्यांचा तोरा व जुना सरंजामशाही अभिमान काही विचारूच नका ! 'कुलवंताच्या स्त्रियांनी चावडीवर येऊन मास्तरासमोर पाटी-पेन्सिल घेऊन बसायचे ! आमच्या घराण्याच्या परंपरेला हे शोभणार नाही,' ही यांची आतला वृत्ती; आणि ‘गाव शंभर टक्के साक्षर झालाच पाहिजे ; सर्वांनी वर्गाला हजर राहिलेच पाहिजे,' हा या मंडळीचा सभेतील पुकारा ! काय अर्थ आहे या विसंगतीत! असल्या दिखाऊ आवाहनाचा गावावर काहीही परिणाम होत नाही आणि समितीचे जनजागरणाचे कामही केवळ कागदावरच रहाते असा सगळीकडचा अनुभव आहे. उलट ज्या ठिकाणी गावात नैतिक वजन असलेली एखादी म्हातारा बाई किंवा आजोबा यांच्याकडे हे कार्य सहजगत्या सोपविले गेले, तेथे कामाचा उठाव जबरदस्त झाला. विशेषतः एखादी म्हातारी बाईच सारा गाव हलवून सोडते असा अनुभव आहे. ती स्वतः वर्गाला येत नाही, पण प्रत्येक घरातील स्त्री तिच्या धाकाने बाहेर पडते ; घरातील पुरुषमंडळींनाही म्हातारीच्या सांगण्यावरून आपली माणसे पाठवायला काही भय व संशय वाटत नाही. एखाद्या पाटील-तलाठयाने बायामाणसांना वर्गासाठी चला म्हणणे वेगळे आणि म्हातारीने स्वयंपाकघरात उभ राहून, वेळ पडल्यास मुलाबाळांना सांभाळण्याची जबाबदारी स्वतःच पत्करून घरातील स्त्रीला वर्गासाठी बाहेर काढणे वेगळे. आणि एकदा स्त्री जागी झाली की, तेथे विचार रुजलाच म्हणून समजावे. कारण स्त्री कोणतीही गोष्ट मनापासून, प्रामाणिकपणे करीत असते. दिखाऊपणा, मिरविण्याची हौस, मोठेपणाचा हव्यास हे पुरुषी गुणविशेष तिच्याजवळ नसतात. तिचे करणे सहज असते ; नैसर्गिक असते; म्हणनच ते समाजाच्या मुळाशी जाऊन भिडते. गावशिक्षण मोहिमेचा अनुभव हेच सांगतो की, जेथे स्त्री शिकली तेथे लहान मुले सुधारली, घर सुधारले आणि शेवटी गावातही हळूहळू बदल घडत गेला.

। १२ ।