पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक परिस्थिती

यंत्रणेचा विचार याप्रमाणे थोडाफार केल्यावर 'सामाजिक परिस्थिती' हा यापुढचा विषय. येथे कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्ण्याचे उदाहरण घेऊ. संपूर्ण कोरेगाव तालुक्यातून रेल्वेलाईन गेली असल्यामुळे यातील प्रत्येक गावाचा बाहेरच्या जगाशी फार पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आलेला आहे. अल्पबचत योजनेपासून बालवीर चळवळीपर्यंत सातारा जिल्ह्यात हा तालुका आजवर नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. पोलीस व मिलिटरी खात्यात या तालुक्यातून भरती विशेष प्रमाणात होत असल्याने एक प्रकारचे जोमदार वातावरण या तालुक्यातील गावातून नेहमीच पहावयास सापडते. प्रत्यक्ष ल्हासुर्ण्यात आज दर घरटी एक माणूस या खात्यात होता किंवा आहे असे म्हटले तर त्यात फारशी अतिशयोक्ती होणार नाही. एक दिवसाच्या मुक्कामात जमादार, हवालदार ही मंडळी मला कितीतरी भेटली. कोणी काश्मिरात आपण रस्ते कसे बांधून काढले हे सांगतो, कोणी बडोद्याला गव्हर्नराच्या बंदोबस्तासाठी गेलो असता संस्थानचा कारभार कसा होता याची वर्णने करतो; इटली, फ्रान्स, उत्तर आफ्रिका, ब्रह्मदेश, मलाया येथपर्यंतचा मुलूख पायी तुडवून आलेली ही मंडळी ! मिलिटरीतील शिस्त अंगी पक्की भिनलेली. गाव साक्षर करण्याचे एकदा ठरल्यावर मग आगेमागेची भाषाच नाही. सारे मिलिटरीच्या खाक्यात अखेरपर्यत व्यवस्थित पार पडले. हीच परिस्थिती साताऱ्याजवळच्या अपशिंगे या गावची. तेथील गावशिक्षण मोहिमेच्या यशाचे बरेचसे श्रेय या सैनिकी जोमदारपणाला दिले पाहिजे. पण अशी परिस्थिती फार झाले तर अकरांपैकी एखाद्या तालुक्यात, पाचपन्नास गावात! या गावांच्या जोरकस कामांचा अनुभव प्रमाण मानून जिल्ह्यात सर्व इतर ठिकाणी असाच उठाव व्हावा ही अपेक्षा धरणे कितपत योग्य होते? जावळीसारखा दऱ्याखोऱ्यात किंवा झाडाझुडपात दडलेला तालुका वेगळा; फलटणसारख्या संस्थानिक वातावरणात वाढलेल्या तालुक्याची प्रकृती वेगळी; माणसारख्या धनगरांची फिरती वस्ती ( Floating population ) असणाऱ्या तालुक्याचे स्वरूप वेगळे. ही सामाजिक व प्रादेशिक भिन्नता ध्यानात न घेता आखलेली ढोबळ मोहीम शेकडा १० ते १५ टक्के एवढ्या प्रमाणातच यशस्वी होणार यात नवल ते काय ?

फुलेनगर आणि बावधन

भिन्नभिन्न तालुकेच कशाला ! एकाच तालुक्यातील दोन गावांची भिन्नभिन्न परििस्थती व त्यामुळे कामात पडलेली विलक्षण तफावत पहा. एकूण वाई तालुका मध्यम व सर्वसाधारण प्रगतीचा नमुना म्हणून समजण्यास हरकत नाही. वाईजवळच फुलेनगर ही एक वस्ती या मोहिमेत संपूर्ण साक्षर झाली. एकदिलाने गावातील सर्व

। १३ ।