पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनिश्चित अधिकारक्षेत्रे

केवळ शिक्षक आपल्या जोरावर आजच्या परिस्थितीत हे कार्य करण्यास असमर्थ आहे हे ध्यानात आल्यामुळेच की काय, या मोहिमेत महसुलखात्याने आपला नोकरवर्ग गुंतविण्याचा संकल्प केला. मी पाहिलेल्या चार तालुक्यात केवळ एका तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या कामाविषयी शिक्षकांनी समाधानाचे उद्गार काढले. मामलेदार, विकास योजनाधिकारी वगैरे मंडळी या ठिकाणी गावात जात असत. सभा बैठका घेत असत. गावकऱ्यांना वर्गाला हजर रहाण्याविषयी सत्तेने सांगत असत. कर्जमंजुरी, तगाई वगैरे प्रकरणी साक्षरतेचा विचार केला जाईल असा व्यवहारिक लाभालाभाचा चिमटाही काढीत असत. जेथे महसूलखात्याने एवढेच क्षेत्र आपल्यासाठी आखून घेतले, तेथे शिक्षकांचे कामही पुष्कळच सोपे झाले व एकूण यशाचे मापही चढते राहिले. पण बहुतेक ठिकाणी विभागणी नीट झाली नाही. मामलेदारसाहेबांनी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावीत, तलाठ्याप्रमाणे शिक्षकाला दावणीला जुंपण्याचा प्रयत्न करावा, मग खात्यांच्या अधिकारक्षेत्राविषयी वाद निर्माण व्हावा, त्यातून संघर्ष व शेवटी कामाचा खोळंबा हे प्रकार अनेक ठिकाणी ऐकावयास मिळाले. कुठे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावांना जीपमधून ‘व्हिजीट' देऊन काम केल्याचा देखावा उभा केला गेल्याची परिस्थिती पहावयास सापडली. दोन शेजारी शेजारी असणाऱ्या गावांपैकी एका गावात महसूल अधिकारी वरचेवर येऊन शिक्षणाच्या कामाला चालना देतात आणि दुसऱ्या गावात संपूर्ण मोहिमेच्या कालावधीत महसुलखात्याचा एकही अधिकारी डोकावत नाही, हाही प्रकार नवीनच दिसला. शिक्षणखाते व महसूलखाते यांनी प्रथमच विचारविनिमयाने सहकार्याची एखादी योजना निश्चित केली असती, तर असल्या विसंगती व संघर्षाचे प्रसंग सहज टाळता येऊन कामाला अधिक उठाव देता आला असता. ‘सहकार' हा बोलायला सर्वात सोपा व आचरण्यास सर्वात अवघड असा विषय आहे, याची जाणीव यापुढे आम्ही बाळगणे यासाठीच फार अवश्य आहे.

मोहिमेतील शेवटचा घटक म्हणजे गावसमित्या. गाव करील ते राव करू शकणार नाही ही अगदी वस्तुस्थिती आहे. शिक्षक कितीही तळमळीचा असला, महसूलखात्याच्या सेवकवर्गाने सत्तेचे कितीही दडपण गावावर आणले, तरी जोपर्यंत गावातील जनशक्ती जागी होत नाही तोपर्यंत कोणतेच काम गावात उभे राहाणार नाही आणि राहिलेच तरी ते फार काळ टिकणारही नाही. विकासयोजनांजवळ नाही का आज पैसा मुबलक आहे, हाती सत्ता आहे ? पण गावोगाव इमारती उठविण्यापेक्षा अधिक कोणतेही मूलभूत परिवर्तन या योजना करू शकत नाहीत हे दिसतच आहे. तो नमुना या समाजशिक्षण मोहिमेत होऊ नये, म्हणून गावसमित्या

। ११ ।